महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन

935 0

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे.

यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिल्या क्रंमाकाचे आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्या मंगळवार 31 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.

​दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या पथसंचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ संचलित होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या आशयाखाली “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती” हा विषय निवडला होता. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या लोककला आणि मंदिर शैलींचा वारसा दाखवण्याचाही यातून प्रयत्न करण्यात आला होता. दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ कर्तव्य पथावर संचलित झाला होता. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्या प्रतिकृती चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असणारा लोककलाकार स्वरूपात दर्शवण्यात आला होता. चित्ररथासोबत निषाद गडकरी व सुमित यांच्या पथकाने शानदार नृत्य सादरीकरण केले होते. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले होते. कौशल इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन गीत तयार केले होते. सिद्धेश व नंदेश उमप यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.

या चित्ररथाची मूळ संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांची होती, तर या संकल्पनेचे विस्तारीकरण प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक विभीषण चवरे यांनी केले होते. शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथावरील शिल्पाचे काम साकार केले होते.

१९७१ पासून महाराष्ट्राला १४ वेळा पारितोषिक

दरवर्षी २६ जानेवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होत आहे. आतापर्यंत म्हणजे १९७१ पासून ते २०२३ पर्यंत महाराष्ट्राला १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. सर्वप्रथम १९८१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. १९८३ मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळाले. यानंतर १९८६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक, तर १९८८ मध्ये लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. यानंतर १९९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर १९९४ मध्ये हापूस आंबा या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले. १९९५ मध्ये बापू स्मृती या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने पारितोषिकांवर आपली आघाडी सिध्द केली आहे.

२००७ मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथास तिसरे पारितोषिक, तर २००९ मध्ये धनगर या चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. २०१५ मध्ये “पंढरीची वारी” या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर २०१७ मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे’ या घोषणेचा शताब्दी महोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची १२५ वर्षे या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळाले. २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले, तर २०२२ मध्ये महाराष्ट्राची जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास सर्वात लोकप्रिय चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळाले. आता २०२३ मध्ये “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती” या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतही महाराष्ट्राच्या चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे, हे विशेष. व्हिजनरी परफॉर्मिंग आर्ट या पथकाने हे अप्रतिम सादरीकरण केले होते. सांस्कृतिक संचालनालयाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्ररथ या दोन्हीवर खूप मेहनत घेतली होती.

आतापर्यंत एकूण ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक, तर ४ वेळेस दुसरे पारितोषिक आणि २ वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे. एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी मानले आभार

१९७० पासून दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्र चित्ररथ सादर करीत आहे. मात्र, दरवर्षी काही राज्यांनाच चित्ररथ सादर करण्याची संधी मिळत असल्याने आतापर्यंत ११ वेळा महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली नाही. तशी ती यावर्षीही नाकारण्यात आली होती. मात्र, नागपूर अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दूरध्वनी करून महाराष्ट्राला यावर्षी चित्ररथ सादर करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. सिंह यांनी महाराष्ट्राला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्री. मुनगंटीवार यांनी श्री. सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.

Share This News

Related Post

devendra-fadnavis

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 1, 2023 0
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा…
Ajit Pawar and Narendra Modi

Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा दिला. त्यांनतर अजित पवारांनी (Ajit…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…
Sharad Pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *