श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं छत्रपती शिवरायांना पत्र! काय लिहिलंय पत्रात… पाहा

369 0

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज किल्ले रायगडावर आक्रमक भाषण केलं. निर्धार शिवसन्मानाचा म्हणत उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर तोफ डागली. याप्रसंगी दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवण्यात आलं. या पत्रात उदयनराजेंनी छत्रपती शिवरायांना कोणतं वचन दिलंय… पाहूयात… उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र अगदी जसच्या तसं..

मुजरा महाराज,
महाराज…..
आज खूप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची, आम्ही आपल्याशी अंश-वंश म्हणून नाही तर आपला एक
सर्वसामान्य मावळा म्हणून, एक शिवभक्त म्हणून बोलतोय. आपण स्वराज्याचा पाया रचला, त्याला पावणे चारशे वर्षे
झाली. एवढ्या वर्षांत आम्हाला कुणाला आपल्याकडं वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाही.
कारण आपण रयतेसाठी इतकं मोठं स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र, आपला हिंदूस्थान,
आपण घालून दिलेल्या आदर्शावर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता मात्र अलिकडच्या काळात हद्द
झाली. विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय अशी रास्त भीती निर्माण झाली. अठरा पगड आणि
बारा बलुतेदार यांना घेवून निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय असा विचार येवून मन विषण्ण
झालं. म्हणूनच फक्त मनमोकळं करायला लिहितोय, मनोमन समक्ष उपस्थित राहून हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो.
सगळीकडंच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचं कुठं ? व्यथा मांडायची कुठं ? सगळं दिशाहीन झालंय.
एकही विश्वासार्ह ठिकाण राहिलं नाही. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय महाराज…
महाराज, आपण इथल्या किल्ल्यात, पर्वतात, नदीत, जंगलात, डोंगररांगांत, मातीच्या प्रत्येक कणात आणि
प्रत्येक माणसाच्या मनात आहात. आपल्याबद्दल लिहिल्या, बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दात आजही तेवढाच आदर
असतो. अभिमान असतो. डोक्यात मोठा आणि छोटा मेंदू जागच्या जागी असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर
नतमस्तक आहे पण छोटा आणि मोठा मेंदू सोडून काही मूठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा मेंदू असतो. टाळू
भरताना सटकून डोक्यावर पडलेली दोन-चार मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात.
वाईट वाटतं. विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील ही विकृती आहे. हे स्वातंत्र्य नाही
तर स्वैराचार आहे. आपल्या विषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन, असं जर कोणी म्हणत असेल तर
त्याची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्या सारख्या विश्वाचं दैवत असलेल्या छत्रपतींचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही.
आपल्यावर आमचा जेवढा हक्क आदे तेवढाच हक्क प्रत्येक मावळ्याचा आहे. मायमाउलींचा हक्क आहे. वडीलधाऱ्यांचा आणि सर्वांचाच हक्क आहे म्हणून आपल्याबद्दल चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत दाखवणाऱ्या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिले आहे पण आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मूठभर लोकांच्या मनातली ही विकृती कायमची ठेचायची आहे. ही एकट्या दुकट्याची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही, ही फक्त मराठी माणसाची लढाई नाही तर देशाच्या अस्मितेचा लढा आहे. म्हणूनच थेट आपल्याशी संवाद साधतोय. महाराज… एक गोष्ट आज पुन्हा प्रकर्षानं जाणवली, तुमचे मावळे नावालाच एक आहेत. आमचे गट, तट वाढलेत. प्रत्येकाला त्याचा गट, त्याची विचारधारा याचा फायदा बघायचा आहे. हरकत नाही पण एकत्र यायला एक कारण किंवा एक विषय आजही आम्हाला पुरेसा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

आता कुठल्या गटाचा असो किंवा कुठल्या जाती-पातीचा असो, जो कुणी आपला मावळा आहे तो आपल्यासाठी एकत्र येणारच आणि या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला शिरसावंद्य असेल पण इथुन पुढं आपल्याबद्दल एक वाक्य काय एक शब्द जरी कुणी चुकीचा बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही.  आपले संस्कार आहेत आमच्यावर. आजवर कधी कुठल्या कलाकृतीला विरोध केला नाही. राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातो, आपल्या नावानं घोषणा दिल्या जातात पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर, राजकारणी मूग गिळून गप्प बसतात तेव्हा वाईट वाटतं. उठसूठ आपली तुलना कुणाशीही करणाऱ्यांना इतिहासाचा धडा शिकवावाच लागणार आहे. आजवर आम्ही विचारी लोकांना मान दिला म्हणून विकृतांना मान देणार नाही. आपल्याला वचन देतो, आपल्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीत कुठल्याही

महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण आम्हाला स्वधर्माबरोबरच सर्वधर्मसमभावाची शिकवण दिलीय. पहिल्यापासून आम्ही कायम आपल्या मावळ्यांच्या सोबत आहोत आणि जे काही करायचं ते आम्ही एकत्र मिळून करू. महाराज… आपल्याकडून एक गोष्ट शिकलोय, एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येणार नाही. यात कुठंही राजकारण न आणता एक होण्याची हीच ती वेळ आहे. विकृत लोकांशी कसं वागायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे परंतु इथं काही विकृत माथी आहेत. ती कायमची वठणीवर आणायची आहेत. वारंवार

आपल्याकडं बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे. आपल्या माणसावर वार करायचा नसतो पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अशांना कठोर शासन करण्याची वेळ येवून ठेपली आहे… आणि महाराज… आम्ही आपल्याला वचन देतो की, कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान आता सहन केला जाणार नाही. महाराज… आशीर्वाद द्या…
जय भवानी जय शिवराय !
जय जिजाऊ जय शिवराय !

Share This News

Related Post

नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर असलेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे आवाहन

Posted by - November 23, 2022 0
पुणे : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील नवीन कात्रज…
Mantralaya

15 ऑगस्टपूर्वी 75 हजार पदांची होणार मेघाभरती

Posted by - May 15, 2023 0
सोलापूर : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त स्वरूपात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…
Shivajinagar Metro

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन करावे राष्ट्रवादीची मागणी

Posted by - June 6, 2023 0
पुणे : आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर च्या वतीने पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून…
Pune Crime News

Pune Crime News : ऐन सणासुदीच्या वेळी पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई! 5 टन बनावट पनीर जप्त

Posted by - August 29, 2023 0
पुणे : पुणेकरांनो (Pune Crime News) तुम्ही खात आहात ते पनीर भेसळयुक्त तर नाही ना? कारण ऐन सणासुदीच्या तोंडावर पुण्यात…

श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील  श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार

Posted by - July 3, 2024 0
पुणे, प्रतिनिधी – श्रीमती इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ नवी पेठ येथील तब्बल १३८ वर्षे पुरातन श्री. विठ्ठल–रुख्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *