1 लाख 21 हजार युवक, युवतींना उद्योग, कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार; नोकऱ्या देणारे हात निर्माण करुया – मुख्यमंत्री

256 0

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराची उपलब्धता व्हावी यासाठी आज राज्यातील ४४ नामांकीत उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील १ लाख २१ हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सामंजस्य करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उद्योगांनी आता त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ सुलभतेने मिळू शकेल, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चालू आर्थिक वर्षात राज्य शासनाने राज्यातील ५ लाख बेरोजगार युवक, युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार मेळाव्यामार्फत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी औद्योगिक आस्थापना, प्लेसमेंट एजन्सी यांच्यासमवेत वेळोवेळी समन्वय साधणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने भविष्यातील रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन होण्यासाठी आज हे सामंजस्य करार करण्यात आले. या कराराद्वारे राज्यातील बेरोजगार युवक, युवतींसाठी आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), मिडीया अँड एन्टरटेनमेंट, बांधकाम, रिटेल, बँकींग, एव्हीएशन इत्यादी विविध क्षेत्रामध्ये दहावी पास, नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. इथे आयटीआयपासून आयआयटीपर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणविषयक सुविधा आहेत. राज्य शासनाने नुकतेच कौशल्य विद्यापीठही सुरु केले आहे. युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना रोजगाराची उपलब्धता व्हावी यासाठी कौशल्य विकास विभागाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. उद्योजकांनी या कामात सहभाग घेऊन आज झालेल्या सामंजस्य करारांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रासह जम्मु काश्मिरसारख्या राज्यातही गुंतवणुकीसाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अगदी शौचालय निर्मितीपासून उद्योगाला प्रोत्साहन देण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात भरीव काम होत आहे. सर्वांनी मिळून देशाच्या विकास प्रक्रियेत हातभार लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नोकऱ्या देणारे हात निर्माण करुया – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नोकऱ्या घेणाऱ्यांबरोबरच नोकऱ्या देणारे हात देखिल निर्माण करा, असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत. आजच्या कार्यक्रमातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा संकल्प आपण केला आहे. नजिकच्या काळात राज्यात मोठे उद्योग येतील व त्याद्वारे राज्याच्या विकास प्रक्रियेला अजून गती प्राप्त होईल. राज्य शासन त्यादृष्टीने व्यापक काम करत असून प्रधानमंत्र्यांनीही यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात अनेक उद्योगांनी गुंतवणुक सुरु केली आहे. शासनामध्येही भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली असून याद्वारे ७५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

गडचिरोलीमध्ये पालकमंत्री असताना तिथे उद्योगाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यातुन अनेक स्थानिकांना तिथे रोजगार मिळाला आणि नक्षलवाद कमी करण्यात त्याचे मोठे योगदान राहीले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मागील काही दिवसांपासून कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतेसाठी कौशल्य विकास विभाग व्यापक कार्य करत असून त्यातून अनेकांना लाभ होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रोजगाराच्या नवीन संधींमुळे अर्थव्यवस्थेला हातभार – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तरूणांची संख्या मानव संसाधनात परिवर्तित करून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. आजही भारतातील तसेच महाराष्ट्रातील 45 टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला सेवाक्षेत्र व उत्पादन क्षेत्राशी जोडले गेले पाहिजे. त्यामुळे शेती क्षेत्रावरील 20 टक्के रोजगाराचा भार कमी होईल. यामुळे शाश्वत विकासाकडे वाटचाल शक्य होईल.

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध विभागांचा अभ्यास करून तरूणांना कौशल्य विषयक प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. केंद्र शासनाने १० लाख शासकीय नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातही शासकीय क्षेत्रात 75 हजार नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात 1 हजार स्किल सेंटर – मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात उद्योगपूरक वातावरण असल्याने तरुणांना विविध क्षेत्रानुसार कौशल्य देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या वर्षभऱात 1 हजार स्किल सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. याद्वारे ग्रामीण युवकांना रोजगारासाठी शहरांमध्ये येण्याची गरज राहणार नाही. प्रत्येक सक्षम तरुणाला नोकरी मिळावी या अनुषंगाने कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

महास्वयंम ॲप शासन-उद्योग क्षेत्रासाठी महत्वाचा दुवा – मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या वतीने तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विभागामार्फत सुरू करण्यात आलेले महास्वयंम ॲप हे शासन व उद्योग क्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. यासाठी उमेदवार आणि उद्योजकांनी या ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले. कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून आपण तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना दरवर्षी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या कंपन्यांशी झाला सामंजस्य करार

हिंदू रोजगार डॉट कॉम (5 हजार रोजगार), क्यूसेस कॉर्प लिमिटेड – स्टाफिंग सोल्युशन्स (2 हजार रोजगार), बझवर्कस् बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (1 हजार 500 रोजगार), युवाशक्ति स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (10 हजार रोजगार), सेंच्युरियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट – ग्राम तरंग व्होकेशनल ट्रेनिंग सर्व्हिसेस (2 हजार 500 रोजगार), परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (10 हजार रोजगार), विन्डो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (500 रोजगार), बीएसए कार्पोरेशन लिमिटेड (5 हजार रोजगार), अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (10 हजार रोजगार), सुमित फॅसेलिटी लिमिटेड (4 हजार रोजगार), इनोव्हेशन कम्ज जॉईंटली (500 रोजगार), नेच्युअर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन (5 हजार रोजगार), परम जॉब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), वंदन हॉस्पिटॅलिटी (5 हजार रोजगार), महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (5 हजार रोजगार), मेट्रिक्स कॅड अकॅडमी (5 हजार रोजगार), शुभम सर्व्हिसेस (1 हजार रोजगार), बीव्हीजी इंडिया लिमिटेड (5 हजार रोजगार), अर्बन कंपनी (500 रोजगार), सॅपीओ अन्यालिटिक प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (2 हजार रोजगार), श्रेमिको प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), फास्ट ट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिस (1 हजार रोजगार), इंप्रेटीव्ही बिझनेस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (3 हजार रोजगार), स्पॉट लाईट कन्सल्टंट (2 हजार रोजगार), मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (500 रोजगार), डीएसटीए एज्युकेशन फाउंडेशन (1 हजार 800 रोजगार), एल के कन्सल्टंटस् (500 रोजगार), वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, एग्रीकल्चर अँड इंडस्ट्री (5 हजार रोजगार), कॅपिटल सिक्युरिटी फोर्स (2 हजार रोजगार), स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स (2 हजार रोजगार), संत शिरोमणी एंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), टीएनएस एंटरप्राईजेस (5 हजार रोजगार), अविघ्न नाईन मीडिया अँड एंटरटेनमेंट (2 हजार रोजगार), इंजिनीयर्स क्रेडल (500 रोजगार), ओम्प्रि बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार रोजगार), स्टेलर सेक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस (2 हजार रोजगार), ओडीई स्पा (500 रोजगार), शार्प एचआरडी सर्विसेस प्राइवेट लिमिटेड (500 रोजगार), युनिकॉर्न इन्फोटेक (2 हजार रोजगार), आउस्टफायर सेफ्टी इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (500 रोजगार), एचआर इव्हेंजेलिस्ट (500 रोजगार), थॉमस रिक्रुटमेंट सोल्युशन (2 हजार रोजगार), श्रीकृपा सर्विसेस प्राइवेट लिमिटेड (2 हजार रोजगार)

Share This News

Related Post

Yavatmal News

Yavatmal News : दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं ! सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह

Posted by - August 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेमुळे (Yavatmal News) संपूर्ण यवतमाळ हादरलं आहे. यवतमाळच्या खानगाव…

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Posted by - March 2, 2022 0
पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : राहुलच्या अटकेनंतर दर्शनाच्या आईने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - June 22, 2023 0
अहमदनगर : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दर्शना पवार हत्या प्रकरणी (Darshana Pawar Murder Case) पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी…
Satara Crime

Satara Crime : तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींचा; ‘त्या’ एका पावतीवरून पोलिसांनी लावला छडा

Posted by - October 4, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये काही दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची हद्दीत एका…

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022 0
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *