गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा स्तर ढासळत चालला असून जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक हेवेदावे यांनाचं सत्ताधारी विरोधक जास्त प्राधान्य देत असल्याचं पहायला मिळतंय.
देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राजकारण म्हणून पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं जायचं. मात्र अलीकडच्या दिवसात हे कमी होताना दिसत असून राजकीय कटुता संपली पाहिजे असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला होता. मात्र दोन्हीकडूनही राजकीय कटूता संपताना दिसत नाही अशातच निधन झालेल्या लोकप्रतिनिधीच्या जागेवरून देखील महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात.
भाजपाच्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाला उणेपुणे दोन दिवस झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षानं सांगितल्यास आपण ही जागा लढवणार असल्याचं म्हणत राजकीय चर्चेला उधाण आणलं होतं. त्यानंतर आता ही पुण्याच्या राजकारणातील अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असणाऱ्या पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे तीन दिवस झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा काँग्रेस लढणार असल्याचं म्हटलं आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याला दुजोरा देत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडेच असल्याचं सांगितलं.
मात्र बापट यांना जाऊन केवळ दोन दिवस झाले असून ही घाई कशासाठी असं म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावलं खरं मात्र प्रश्न हाच पडतो ज्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अवडंबर वारंवार वाजवलं जातं ती राजकीय संस्कृती हीच आहे का? एखादा लोकप्रतिनिधी गेल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी राजकीय चर्चा करणे कुठल्या राजकीय संस्कृतीत बसतं हा देखील एक प्रश्नच आहे.
हे झाले विरोधी पक्षाचे… विरोधक असल्यामुळे ते अशी भूमिका घेतात हे एकवेळ आपण समजू शकतो. पण आपल्याच पक्षाचा खासदार जाऊन तीनच दिवस उलटले असताना त्याच पक्षाच्या शहराध्यक्षाने पोस्टरबाजी करून स्वतःला भावी खासदार म्हणवून घेणे हे कोणत्या नैतिकतेमध्ये बसते असा प्रश्न विचारावासा वाटतो. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमध्ये भावी खासदार म्हणून उल्लेख केल्याचे पाहायला मिळतंय.
अजून गिरीश बापट यांच्या चितेवरील राख थंड झाली नाही तोच तुम्ही राजकारणाचे डाव खेळत असाल तर महाराष्ट्राचा राजकीय स्तर दिवसेंदिवस ढासळू लागला आहे असेच म्हणावे लागेल.
असो… विरोधी पक्षाच्या उमेदवाराला प्रचारासाठी गाडी देणाऱ्या नितीन गडकरींचा दिलदारपणा संपूर्ण देशाने पाहिला तर नारायण राणे यांनी दिलेला कोट घालून अर्थसंकल्प सादर करणारे जयंतराव पाटील देखील राज्याने पाहिले असा दिलदार आणि समंजसपणा पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळो हीच अपेक्षा.
– संकेत देशपांडे
रिपोर्टर, TOP NEWS मराठी, पुणे