इतिहास अभ्यासकांची पंढरी – भारत इतिहास संशोधक मंडळ

180 0

इतिहास अभ्यासकांची पंढरी – भारत इतिहास संशोधक मंडळ

पुण्यातील या वास्तूचा आज ११२ वा वर्धापनदिन.

३१ मे १९५३ रोजी यशवंतराव चव्हाण लिहितात, ”मुद्दाम सवड काढून आज जवळ जवळ तीन तास भारत इतिहास संशोधक मंडळात काढले. हे तीन तास माझेसाठी एक प्रकारचे ‘शिक्षणच’ होते म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.”

‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ ही वास्तू म्हणजे ऐतिहासिक पुण्याचा मानबिंदू. वास्तूस ‘मंडळ’ या नावानेही ओळखले जाते. या स्वायत्त संस्थेची स्थापना ७ जुलै १९१० साली इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व सरदार खंडेराव चिंतामणी उर्फ तात्यासाहेब मेहेंदळे यांनी मेहेंदळ्यांच्या म्हणजेच अप्पा बळवंत चौकातील त्यांच्या वाड्यात मंडळाची स्थापना झाली होती. भारताच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी ही संस्था स्थापली गेली. नंतर सदाशिव पेठेत मंडळ स्थलांतरित झाले.

भरत नाट्य मंदिराशेजारी प्रथमदर्शनी दिसते ती मंडळाची मुख्य वास्तू. ती सन १९२४ साली बांधण्यात आली आहे. १९२९ मध्ये डॉ. जस्टिन ॲबट यांची ३० हजार डॉलर्सची मोठी देणगी मंडळासाठी अतिशय उपयुक्त ठरली होती. मंडळाची मागील बाजूस असणारी इमारत महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यांच्या अनुदानातून १९६५ मध्ये बांधण्यात आली आहे.

सुरवातीच्या काळात अमाप परिश्रम घेऊन संशोधकांनी कागदपत्रे, नाणी, चित्रे अशा वस्तूंचा संग्रह केला. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, वा. सी. बेंद्रे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, शं. ना. जोशी, वासुदेवशास्त्री खरे, य. न. केळकर, ग. ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, गजानन भास्कर मेहेंदळे अशी यादी करावी तर खूप मोठी होईल एवढे थोर इतिहासकार मंडळाच्या माध्यमातून लाभले आहेत. अशा प्रमुख इतिहासकारांची चित्रे-छायाचित्रे आपल्याला वि. का. राजवाडे सभागृहात लावलेली दिसतात. संस्था इतिहास अभ्यासकांना ११० वर्षाहून अधिक काळ मार्गदर्शन करत आहे. विशेषतः मराठ्यांचा इतिहासाचे अध्ययन करणाऱ्यास ही वास्तू म्हणजे मंदिरासमान आहे.

संग्रहालय –

मंडळाचे स्वतःचे संग्रहालय मुख्य इमारतीच्या मागील बाजूस आहे. ते मुखतः दोन दालनांमध्ये पहायला मिळते. १९९९ साली त्याचे उदघाटन शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात दुर्मिळ कागदपत्रे, चित्रे, पुस्तके आणि वस्तू अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. संग्रहालयाच्या इमारतीच्या व्हरांड्यात बाहेर वीराची स्मृतीशिळा म्हणजे वीरगळ, देव-देवतांच्या मूर्ती, त्याकाळी सरंक्षणासाठी वापरण्यात येणारा गद्धेगळ, पेशवेकालीन पुण्याच्या पाणीपुरवठ्याचे अवशेष कात्रजचे दगडी नळ अशा गोष्टी दिसतात. प्राचीन पुण्याच्या स्मृती असलेली मंदिरे म्हणजे पुण्येश्वर व नारायणेश्वर. ती मंदिरे आज अस्तित्वात नाहीत. त्या मंदिरांच्या द्वारशाखा व शिल्पे येथे दिसतात.

संग्रहालयाची खासियत म्हणजे जुनी दुर्मिळ कागदपत्रे. असंख्य मोडी लिपीतील कागदपत्रे व फारसीमधील बादशाहांची फर्माने आहेत. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत कागदपत्रे येथे आहेत. दगडी, संगमरवरी व पितळी अशा सुबक मूर्तीसुद्धा इथे पाहायला मिळतात. यात शिव-पार्वती, विष्णू, गणपती, भैरव व कुबेराची मूर्ती यांचा समावेश होतो. तोफेचे गोळे, तलवारी, ठासणीच्या बंदुका, दांडपट्टा व कट्यारींचा हत्यारांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. हत्तीच्या पाठीवर ठेवण्यात येणारी हौदा व उत्सवात वापरण्यात येणारी अंबारी पहायला मिळते. काल्पनिक दिवाणखाना येथे उभा केला आहे. लहान मोठ्या आकाराच्या भगवद्गीता पहायला मिळतात.

मंडळातील पोथीशाळेत विविध भाषांतील ३३ हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. मुखतः संस्कृतमधील पोथ्या तर काही सचित्र पोथ्या आहेत. शोभेच्या लाकडी वस्तू, पितळी अडकित्ता, छोटा पंचांग, चामड्याच्या व हस्तिदंती गंजिफा, तांब्याचे कॅलेंडर संग्रहित केले आहे. वेगवेगळे ताम्रपट देखील पाहायला मिळतात. मंडळाने कराड येथे केलेल्या उत्खननात सापडलेले अवशेष येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. हडप्पा, सातवाहन आणि महापाषाणयुगीन खापरे, भांडी व इतर अवशेष पहायला मिळतात.

स्वतंत्र लघुचित्रांच्या दालनात सुमारे १२०० चित्रांचा समावेश आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे दुर्मिळ अस्सल चित्र येथे पाहायला मिळते. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महादजी शिंदे, नाना फडणीस, माधवराव पेशवे यांच्या चित्रांचा समावेश आहे. काचचित्रे, छिद्रचित्रे हे येथील चित्रांचे प्रकार. वाराणसी येथील घाटाचे छोटीछोटी छिद्र असलेले छिद्रचित्र आहे. त्यातील दिवा चालू झाल्यावर अप्रतिम दिसते. नाना फडणवीसांनी अशी चित्र बनवून घेतली होती. किल्ल्यांच्या छायाचित्रांसह अनेक जुने नकाशे आहेत. इ. स. १८६९ ते १८७२ मध्ये सर्वे करून तयार केलेला पुण्याचा नकाशा बघायला मिळतो. त्यात पुण्यातील अनेक वास्तू येथे पाहायला मिळतात. जगाचा नकाशाही बघण्यास मिळतो.

इथला नाण्यांचा संग्रह आपल्याला आकर्षित करतो. अगदी सातवाहनांपासून ते मराठा साम्राज्यापर्यंतची अशी विविध राजसत्तांची नाणी पाहायला मिळतात. १८७२ मधील एका नाटकाची जाहिरात बघायला मिळते. पुण्यातील पहिले चित्रपटगृह म्हणजे ‘आर्यन’. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या या टॉकिजमधील एक खुर्ची येथे जतन केली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे पहिल्या मजल्यावरील संदर्भ ग्रंथालय म्हणजे पुण्याचे भूषण आहे. दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ येथे आहेत. येथे लंडनहून छापून प्रकाशित केलेले १६८७ सालचे इंग्रजी प्रवासवृत्त संग्रही आहे. जवळपास २५००० हजार पुस्तकं येथे आहेत. ग्रंथालयाचे सभासदत्व घेऊन आपल्याला त्याचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच मंडळाकडे १९व्या शतकातील वर्तमानपत्रांचा व नियतकालिकांचा संग्रह देखील आहे. ज्ञानसिंधु, ज्ञानप्रकाश, केसरी, इंदुप्रकाश असे अनेक अंक आहेत.

मंडळाची प्रकाशने –

मंडळाने आजपर्यंत अनेक ग्रंथांचे प्रकाशन केले आहे. त्यातही शिवचरित्रासंबंधी अनेक महत्वाचे संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. शिवचरित्र साहित्य खंड, शिवकालीन पत्रसारसंग्रह, ऐतिहासिक फार्सी साहित्य असे अनेक संशोधनपर ग्रंथ मंडळाने प्रकाशित केले आहेत. इंग्रजी कागदपत्रांसंबंधीचा ‘इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी’ हा ग्रंथ तसेच शिवभारतही मंडळाने छापून प्रसिद्ध केला आहे. संशोधकांचे संशोधन प्रसिद्ध करण्याकरता ‘त्रैमासिक’ छापले जाते. मंडळाची काही प्रकाशने व इतर पुस्तके मंडळात विक्रीस उपलब्ध असतात.

२०१० साली मंडळाच्या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मोडी लिपी वर्ग, फारसी भाषेचे वर्ग, दुर्ग इतिहास वर्ग तसेच संशोधकांचे व्यासपीठ असलेली पाक्षिक सभा, इतिहासपर व्याख्यानमाला असे विविध उपक्रम वर्षभर चालविले जातात. मंडळातर्फे अभ्यासकांना उपयोगी ठरतील असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि द. वा. पोतदार ही दोन सभागृह सशुल्क उपलब्ध असतात. संग्रहालय बघण्यास परवानगी मिळवावी लागते. अशी ही ‘पुण्याचे वैभव’ असणारी ही वास्तू पाह्ण्याची संधी मिळाली तर चुकवू नका.

– सुप्रसाद पुराणिक

Share This News

Related Post

विधानपरिषदेच्या रणसंग्रामाला सुरुवात; दहाव्या जागेवर भाजपा की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी ?

Posted by - June 20, 2022 0
विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून विधान परिषदेतेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार…
Accident News

Accident News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; लेकाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

Posted by - October 5, 2023 0
मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहुर गावच्या हद्दीत…

‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ राज ठाकरेंनी अशी कुणावर केली टीका

Posted by - May 22, 2022 0
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत भोंग्यांसंदर्भातील विषय छेडला. जर मशिदींवर भोंगे लावले तर मशिदिंसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Posted by - January 16, 2024 0
पुणे : पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी (Sharad Mohol Murder Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणात मुळशीतील…
Manohar Joshi

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *