वाह रे नाना…! ‘मोदी’च्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘मोदीं’वर निशाणा !

302 0

प्रसंग १ ला : स्थळ : भंडारा : कार्यकर्त्यांशी बोलताना…
विधान क्र. १ : मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो…

प्रसंग २ रा : इगतपुरी : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना…
विधान क्र. २ : ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं…
————————-

‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना’ साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘टार्गेट’ करत सुटलेत. भाजपला अंगावर घेण्याची एकही संधी नाना पटोले सोडेना झालेत. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका होण्याआधी कार्यकर्त्यांमध्ये ‘हवा’ भरण्यासाठी कुठल्या तरी गावकऱ्याला गुंडांचं लेबल लावत ‘मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो…’ असं वक्तव्य केलं आणि भाजपच्या दंडात बळ भरलं. मग मात्र पंतप्रधान मोदींविरोधातच ते बोलले म्हणून भाजपनं साऱ्या महाराष्ट्रभर नानांविरोधात रान पेटवलं. विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले तर काही ठिकाणी त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले. आता मात्र हे प्रकरण आपल्या अंगलट येणार हे लक्षात येताच नानांनी, ‘मी पंतप्रधानांबाबत नव्हे, तर गावगुंड मोदी’संदर्भात बोललो,’ असं म्हणत घूमजाव केलं आणि नागपूरवासी असलेल्या कुण्या एकाला भंडारावासी बनवून त्याला गावगुंड मोदी म्हणून माध्यमांपुढं आणलं. वास्तविक पाहाता, ‘हाच तो गावगुंड मोदी, मी याच्याविषयी बोललो होतो,’ असं म्हणत नानांनी स्वतः छातीठोकपणे त्याला सर्वांसमोर आणून उभं करायला हवं होतं पण तिथं एका वकिलासह त्याला उभं करत नानांनी याबाबत गूढ निर्माण केलं. नाना सोडा, काँग्रेसचा एखादा पदाधिकारी अथवा कुणी कार्यकर्ता देखील त्यावेळी हजर नव्हता.

माझा पुतळा जाळला तर माझा पुनर्जन्मच होतो…

आता हे काय कमी होतं म्हणून की काय नानांनी ही विझलेली वादाची चूल पुन्हा फुंकणी मारून पेटवली. त्या तथाकथित गावगुंडाच्या स्टेटमेंटची री ओढत नानांनी नवा वाद उभा केला. काय म्हणे तर ‘ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं..’ झालं, तिकडं नाना असं काही बोलायची खोटी की इकडं भाजपवाल्यांनी या चुलीत आणखी लाकडं घालून तिच्यावर आपली पोळी शेकायला सुरुवात केली… पुन्हा एकदा आंदोलनं, निदर्शनं सुरू झाली, नानांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले. एवढं करूनही थांबतील, गप बसतील ते नाना कसले ? नानांनी पुन्हा एकदा ‘मोदी’च्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘मोदीं’वर निशाणा साधला… इगतपुरीत मुंबई प्रदेश काँग्रेसचं तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर होतं. रविवारी (दि.२३) या शिबिराची सांगता झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले काय म्हणाले, ‘गावगुंडांना गावगुंडच दिसणार. आता त्यांची कशी हालत झालीये तेही आपल्याला माहितीये. लोक हसतायत बीजेपीवाल्यांवर की, ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं. गावगुंडानंच सांगितलं, की माझी बायको पळाली म्हणून मला लोक मोदी म्हणतात. देशात एकच मोदी नाहीत. नीरव मोदी आहेत, ललित मोदी आहेत. भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करतायत. माझा पुतळा जाळला तर माझा पुनर्जन्मच होतो. जेवढे पुतळे पेटवायचेत तेवढे पेटवा; तुम्हाला जनता पेटवेल हे लक्षात ठेवा..!’

नाना, हे वागनं बरं नव्हं..!

70 वर्षांहून अधिक काळ देशावर सत्ता गाजवणाऱ्या आणि 115 वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे आपण एक प्रदेशाध्यक्ष आहोत, याची आठवण कुणी तरी नानांना करून द्यावी की काय, अशी सध्याची परिस्थिती झालीये. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींबाबत घडलेल्या घटनेवरही नाना असंच काहीसं बरळले होते. त्यावरून आधीच भाजपवासीयांना अंगावर घेतलेल्या नानांनी वेळीच शहाणं होण्याऐवजी भाजपवाल्यांना पुन्हा पुन्हा अंगावर घेण्यात कसलं शहाणपण हे नानांना कळू नये ? पक्षश्रेष्ठींनी आपल्या खांद्यावर दिलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचे परिश्रम घेण्याऐवजी नाना नको त्या ‘नाना’ गोष्टी करण्यात का वेळ वाया घालवतायत कुणास ठाऊक ? राज्यात एकीकडं स्वबळाबर लढण्याचा नारा देणाऱ्या नानांनी असल्या भानगडीत का पडावं, असा सवाल काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही पडला असेल. नाना, आपण देशातील सर्वांत जुन्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात. नको ती उणीदुणी काढून नको तो वाद ओढवून घेऊन स्वतःसह पक्षाची प्रतिमा कशाला मलिन करताय ?तुमच्यासारख्या अनुभवी आणि मुरब्बी राजकारण्याला हे शोभत नाही. नाना, हे वागनं बरं नव्हं..!


– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन; आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर

Posted by - August 20, 2023 0
बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला…

शनिष्चरी अमावस्येला शनीची कृपा मिळवण्यासाठी करा अशी साधना; अनेक समस्यांपासून मिळेल मुक्ती

Posted by - January 19, 2023 0
या शनिवारी शनिष्चरी अमावस्या येथे आहे. अर्थात मौनी अमावस्या आणि शनिष्चरी अमावस्या यास विशेष महत्त्व आहे. नुकतेच शनीच्या मूळ त्रिकोणी…

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण- दिलीप वळसे पाटील

Posted by - April 19, 2022 0
नागपूर-सध्या राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पुरवली…
Maharashtra Election

Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक

Posted by - January 29, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीचा (Maharashtra Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *