एक सांगू का बाळासाहेब… (विशेष संपादकीय)

521 0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची दोन शकलं झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच जयंती ! शिवसेनेत उभी फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट अस्तिवात आल्यानंतर शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचं हा सुरू झालेला वाद थेट न्यायालयाच्या दारात जाऊन पोचला. या वादाच्या पार्श्वभूमीवर एक सांगू का बाळासाहेब… ‘शिवसेना कुणाची हा वाद ऐकायला आपण आज हयात नाही हे बरंच झालं…’

बाळासाहेबांना एकनाथ शिंदे सोडून गेले नसते कशावरून ?

आता काही जण असंही म्हणतील की, बाळासाहेब असते तर असं काही घडलंच नसतं. शिवसेनेत उभी फूट पडलीच नसती आणि तिची दोन शकलं झालीच नसती. चला, काही अंशी हे म्हणणं जरी खरं मानलं तरी छगन भुजबळ, नारायण राणे आणि दस्तुरखुद्द राज ठाकरे हे सारे बाळासाहेब हयात असताना शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून बाहेर पडलेच होते की ! हे असे निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेला सोडून गेले मग आज बाळासाहेब हयात असते तरी गेल्या दहा वर्षांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासारखे इतर कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांना सोडून गेले नसते हे कशावरून ? राणे, भुजबळ, राज ठाकरे यांची बाळासाहेब आणि शिवसेनेवर निष्ठा होतीच की ! भले, त्यांनी वेगवेगळी कारणं देऊन शिवसेना सोडली होती मग एकनाथ शिंदेंना शिवसेना सोडण्यासाठी एखादं तत्सम कारण शोधणं काही अवघड झालं असतं का ? त्यामुळं बाळासाहेब हयात असताना आणि ते हयात नसताना कुणी कुणी शिवसेना सोडली याची गोळाबेरीज करण्यापेक्षा या सर्वांनी शिवसेना का सोडली याच्या मुळाशी जाणं तितकंच आवश्यक ठरतं.

शिवसेनेतली बंडाळी आणि नव्यानं थाटलेलं सत्तादुकान !

2012 साली बाळासाहेब गेले. कार्याध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे त्यानंतर शिवसेनापक्षप्रमुख बनले आणि शिवसेनेची सारी सूत्रे त्यांच्या हाती एकवटली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना युती तुटली पण निवडणूक निकालानंतर त्यांच्यात पुन्हा युती झाली आणि शिवसेना भाजपसोबत सत्तेत जाऊन बसली. 2019 मध्ये भाजप-शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली खरी पण मुख्यमंत्री कुणाचा या वादावर तोडगा नं निघाल्यानं पुन्हा एकदा युती तुटली. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि शिवसेना पुन्हा एकदा सत्तेत सामील झाली. म्हणजे 2014 ते जून 2022 अशी जवळपास आठ वर्षे शिवसेना याच्या त्याच्या मदतीनं का होईना सत्तेतच होती. ‘काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याऐवजी मी माझं दुकान बंद करेन,’ या बाळासाहेबांच्या वाक्याला हरताळ फासत शिवसेना महाविकास आघाडीचं सत्तादुकान सांभाळण्यासाठी थेट गल्ल्यावर जाऊन बसली. 2019 ते 2022 अशी दोन-अडीच वर्षे हे दुकान चाललं देखील पण या दरम्यान शिवसेनेत अशी काही बंडाळी माजली की, या संघर्ष वादळात महाविकास आघाडीचं सत्तादुकान कोसळलं आणि त्याची मोठी किंमत शिवसेनेला भोगावी लागली. बहुसंख्य नेते शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपच्या मदतीनं स्वतःचं असं नवीन सत्तादुकान थाटलं.

… तिथंच बाळासाहेबांचा विचार पहिल्यांदा मारला गेला !

बाळासाहेबांचे सुपुत्र शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आलं तर एकेकाळचे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह थिजून जाऊन ठाकरे गटाच्या हाती मशाल आली तर शिंदे गटाच्या हाती ढाल-तलवार आली. आता शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कुणाचं ? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी दोन्ही गट कमालीचे उत्सुक आहेत. त्यामुळं बाळासाहेब हयात असते तर असं काही घडलंच नसतं या जर-तरच्या विधानांना काडीचीही किंमत उरत नाही. कारण शिवसेनेनं सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तिथंच बाळासाहेबांचा विचार पहिल्यांदा मारला गेला. त्यामुळं ‘बाळासाहेबांच्या विचारांचे लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ उभारली,’ या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही.

एकूणच काय तर ज्या नेत्याला पक्ष सोडायचा असतो त्याला कुणाच्या असण्या-नसण्यानं काहीही फरक पडत नसतो आणि त्याला शिवसेनाही अपवाद नाही. फरक पडतो तो कार्यकर्त्यांना, पक्षासाठी जिवाचं रान करून पिढ्यानपिढ्या एकाच पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांना..! शिवसेना फुटल्याचं दुःख सर्वांत जास्त कुणाला झालं असेल तर ते कट्टर शिवसैनिकांना..! आज बाळासाहेबही राहिले नाहीत आणि त्यांची शिवसेनाही राहिली नाही… आता राहिलेत ते फक्त तिच्यावर दावा ठोकणारे एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करणारे, तिचे लचके तोडू पाहणारे सत्तांध राजकारणी ! म्हणूनच म्हणतो, ‘एक सांगू का बाळासाहेब, आपण आज हयात नाही हे बरंच झालं…’

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी, पुणे

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा

Posted by - May 31, 2024 0
पुणे : आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले होते. 2013…

“पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 28, 2022 0
नाशिक : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय (PFI) या संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी पीएफआयवर…
Jayant Patil And Sharad Pawar

Maharashtra Politics : 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Posted by - June 1, 2024 0
मुंबई : येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे (Maharashtra Politics) निकाल जाहीर होणार आहेत. या अगोदर अनेक नेत्यांनी दावे – प्रतिदावे…
Latur Accident

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Posted by - December 22, 2023 0
लातूर : राज्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. तुळजापूर औसा महामार्गावर कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा असाच एक भीषण अपघात (Latur Accident)…
Karuna Munde

Karuna Munde : परळीमधून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढविणार; करुणा शर्मा-मुंडेंची मोठी घोषणा

Posted by - February 22, 2024 0
बीड : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. यादरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *