बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीत मोठा धक्का बसला असून मुंडे (Dhananjay Munde) यांचे खंदे समर्थक बबन गित्ते हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी ते 700 गाड्यांचा ताफा घेऊन बीड कडे रवाना झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा असून राष्ट्रवादी मध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा बालेकिल्ला आहे. मात्र, पवार बीडमध्ये धनंजय मुंडे यांना चेकमेट देण्यासाठी या मतदारसंघात येत असल्याचं सांगितलं जात आहे. पवार यांची बीड मध्ये दुपारी सभा असून त्यापूर्वीच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंद समर्थक बबन गित्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बबन गित्ते यांचं बीडमध्ये मोठं प्रस्थ आहे. ते मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. मात्र, मुंडे मंत्री असूनही गित्ते यांनी त्यांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गित्ते हे शरद पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून बबन गित्ते हे धनंजय मुंडे यांच्यासमोरचा नवा पर्याय असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये शरद पवार आपल्या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.