महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठीचं मतदान 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये पाेलीस कर्मचाऱ्यांसह संवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या (सीआरपीएफ) तैनात राहणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
हजारो पोलिसांचा बंदोबस्त
मतदान शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पुणे पोलीस दलातील 600 पोलीस अधिकारी, 6 हजार 800 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे 1 हजार 750 जवान शहरभरात आणि मतदान केंद्रांच्या भागात सेवा देणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक आदेश लागू
मतदान प्रकियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शंभर मीटरचा आत मध्ये मोबाईल नेण्यास बंदी आहे. यासह कोणतंही प्रचार साहित्य मतदान केंद्रांच्या भागात नेण्यास बंदी आहे. असे अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले असून या नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
जिल्ह्यातही पोलिसांची फौज
पुणे शहरासह जिल्ह्यातही पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मतदान केंद्रांसह संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या तुकड्या असणार आहेत. पुणे जिल्ह्यात 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय अधिकारी, 35 पोलीस निरीक्षक, 287 उपनिरीक्षक, 3 हजार 246 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार 600 जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या 11 तुकड्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.