Moshi

Germany’s Dusseldorf : जर्मनीचे ड्युसेलडॅार्फ ते पुण्यातले मोशी….

315 0

गेल्या पन्नास वर्षांत भारतात उद्योग, कृषी, डेअरी, हॅाटेलसह पर्यटन आणि त्यासंबंधी विविध क्षेत्रांचा वेगाने विकास सुरू आहे. अनेक वस्तू आयात करणारा आपला देश त्याच वस्तू निर्यात करण्याच्या क्षमतेचा बनण्यात विविध घटकांचा सहभाग आहे. त्यात राजकीय नेतृत्त्व, शासकीय व खासगी संस्था, शेतकी संस्था व सर्व प्रगतीशील शेतकरी व संबंधीत घटक यांनी मेहनतीने देशाला या स्थितीत आणले आहे.

ही प्रस्तावना यासाठी की यांतील अनेक घटकांबरोबर काम करताना, त्यांची कामाची आणि जागतिक दर्जाचा व्यवसाय करण्याची इच्छा मला दिसते. अशाच एका प्रगतीशील डेअरी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाबरोबर मी ‘सकाळ’च्या माध्यमातून 2007 मध्ये स्वीत्झर्लंड, जर्मनी आणि नेदरलॅण्डचा अभ्यास दौरा केला. त्यात जर्मनीतले ड्युसेलडॅार्फ हे शहर महत्त्वाचे. डेअरी, हॅाटेल या क्षेत्रांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला आम्ही भेट देण्यासाठी हा दौरा केला.

काय खासीयत आहे या शहराची? तर हे शहर म्हणजे जगातले एक महत्त्वाचे प्रदर्शन केंद्र आहे. जगाच्या जवळपास बहुतेक व्यवसाय व क्षेत्रांची प्रदर्शने या शहरात वर्षभर भरतात. त्यात मशिनरी ते फॅशन या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

तसे गेल्या शतकभरात जगात विविध ठिकाणी विविध क्षेत्रांची वैशिष्ट्ये सांभाळत प्रदर्शन केंद्रे सुरू झाली आहेत.

इस्राईलचे ॲग्रीटेक प्रदर्शन, चीनचे कॅन्टन, मॅसे हॅनोव्हरची विविध प्रदर्शने, लंडनचे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट (डब्ल्यूटीएम) हे जागतिक पर्यटनविषयक प्रदर्शन आणि विविध प्रमुख देशांत होणारी कृषी, ॲाटोमोबाईल, बांधकाम यापासून खाद्यपदार्थ ते ॲटोमेशनपर्यंत विभिन्न विषयांची प्रदर्शने यांची वर्षभराची रुपरेषा आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे दिल्लीत प्रगती मैदानात होणारा ॲाटो शो आणि पुण्यात डिसेंबरला होणारे किसान कृषी प्रदर्शन ही गेल्या काही वर्षांत आपली ओळख निर्माण करू शकली आहेत.

मात्र…आपल्या आणि ड्युसेलडॅार्फच्या प्रदर्शनात मुलभूत आणि सैद्धांतिक फरक आहे.

आपल्याकडची जवळपास सर्व प्रदर्शने एक ‘इव्हेंट’ या स्वरूपात होतात. मी पाहिलेले ड्युसेलडॅार्फ शहर आणि त्या शहराची ओळख बनलेले मॅसे ड्युसेलडॅार्फ (जर्मन भाषेत मॅसे म्हणजेच प्रदर्शन- ट्रेड फेअर) ही एक व्यवस्था आहे. या संपूर्ण शहराची अर्थव्यवस्था या प्रदर्शन केंद्राने बदलून टाकली आहे.

मी ड्युसेलडॅार्फला भेट दिली त्यावेळी आगामी पाच वर्षांची प्रदर्शनांची तयारी पूर्ण झाली होती. त्यासाठीच्या वाहन व्यवस्था, हॅाटेल्सच्या बुकिंग, लॅाजेस्टीकच्या अन्य गरजा यांची कायमस्वरुपी व्यवस्था तयार करण्यात आली होती. त्याचाच परिपाठ आजही सुरू आहे. येत्या २०२६ पर्यंतच्या प्रदर्शनांची त्यांची कॅलेंडर तयार आहेत. मॅसे ड्युसेलडॅार्फ ही कंपनी या सर्वांचे नियोजन करते. आता केवळ ड्युसेलडॅार्फ शहरातच नाही तर जगभरात ती विविध प्रदर्शने आणि परिषदा भरवते. आपल्याकडेही मुंबई आणि दिल्लीत ती कार्यालये थाटून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह काम करते. मॅसे ड्युसेलडॅार्फमध्ये होणाऱ्या प्रदर्शनांतून वर्षभरात सुमारे अडीच अब्ज युरोहून अधिकचे उत्पन्न या कंपनीला मिळते. शहराला कोट्यवधीचा कर आणि हजारो जणांना या प्रदर्शनातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कायमस्वरूपी रोजगार मिळतो.

ड्युसेलडॅार्फ हे जर्मनी मधील तसे जुने शहर आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वी हे एक सामान्य गरीब शहर होते. दुसऱ्या महायुद्धात हे शहर पूर्ण बेचिराख झाले होते. त्यातून या शहराने फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आणि प्रगती करत आज जगात एक प्रमुख शहर म्हणून ते नावाजले जाते.

आता आपल्या अशा स्वरूपाच्या प्रदर्शन केंद्र आणि परिसराचा विचार केला तर काय दिसते. दिल्ली आणि मुंबई या प्रमुख शहरातील प्रदर्शने त्या त्या इव्हेंट आणि मर्यादित काळासाठी ओळखली जातात. देशभरात नावाजलेल्या पुण्याच्या ‘किसान’ कृषी प्रदर्शनाने स्थान निर्माण केले असले तरी ते काही काय्मस्वरुपी प्रदर्शन केंद्र बनू शकत नाही.

ड्युसेलडॅार्फ सारखं आपण काही करू शकतो का? असा विचार केला तर काय लक्षात येते. तर आपण आधीच यांचे नियोजन केले आहे.

पिंपरी- चिंचवडदवळ मोशी येथे आपण आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा प्रकल्प करण्याची तयारीही केली होती. त्याचे नियोजन करण्यास सुरूवात झाली पण आतापर्यंत शासकीय आणि संबंधीत संस्थांच्या पातळींवर सामसूम दिसते.

किसान प्रदर्शन भरते ही तीच जागा आहे. यात काय नियोजन होते? साधारण अडीचशे एकर परिसरातल्या या ठिकाणी सव्वा कोटी चौरस फूटाच्या जागतिक प्रदर्शन केंद्रासह मेट्रो स्टेशन, किमान २५ हजार कारसाठी पार्किंग, हॅाटेल्स, व्यावसायिक इमारती, मोनो रेल ( जी ड्युसेलडॅार्फमध्ये आहे आणि तिच्या अतिशय दर्जेदार वाहतुकीचा मी अनुभव घेतला.) इत्यादी इत्यादी करण्याचे नियोजन होते.

आज या प्रचंड जागेच एक किसान प्रदर्शन वगळता काहीही होत नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असल्याने यांचे नियोजन करण्याचे काम महापालिकेने केले. पण जागा होती प्राधिकरणाची. आता प्राधिकरण पीएमआरडीमध्ये समाविष्ट झाल्याने प्रदर्शन केंद्राची जबाबदारी गेली पीएमआरडीएकडे. आपण जागतिक म्हणून हाती घेतलेल्या कामाचा ‘फुटबॅाल’ कसा करायचा याचं हे एक उदाहरण म्हणून लक्षात घ्यायला हरकत नाही.

गेल्या पन्नास वर्षांत ड्युसेलडॅार्फ शहराने आर्थिक विकास करत जी उंची गाठली तिच्या मागे या प्रदर्शन केंद्राचा सिंहाचा वाटा आहे. आज तिथे जागतिक आर्थिक व व्यापारी संस्थांची प्रमुख कार्यालये आहेत. नियोजनबद्ध विकासात ते जर्मनीतले महत्त्वाचे शहर बनले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची ओळख शिक्षण, आयटी आणि ॲाटोमोबाईल यांचे प्रमुख केंद्र म्हणून बनलेली असताना असे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आपल्या या परिसराला खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर नेईल. उद्योगपती श्री. प्रतापराव पवार मराठा चेंबर्सचे अध्यक्ष असताना साधारण वीसेक वर्षांपूर्वी मी त्यांच्याशी या प्रदर्शन केंद्राची चर्चा केली होती.

व्यवस्था इतकी ‘भक्कम’ आहे की गेली वीस वर्षे हे प्रदर्शन केंद्र पुढेच सरकले नाही.

जर्मनीत अनेक प्रमुख शहरांत व्यावसायिक अवश्यकता म्हणून अशी छोटी ते भव्य प्रदर्शन केंद्रे अस्तित्वात आली. आपल्याकडे यासाठी जागा भव्य आहे. त्यासाठी सर्वांचा दृष्चीकोन लवकर भव्य झाला, तर पुण्यात ड्युसेलडॅार्फपेक्षा जास्त वाव आहे.

(ज्येष्ठ पत्रकार सुनील माने)

Share This News

Related Post

Debu Khan

Debu Khan : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - October 19, 2023 0
पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी (Debu Khan) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध…

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १०…
sharad pawar and ajit pawar

‘या’ कारणामुळे पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हतो; अजित पवारांचा खुलासा

Posted by - May 7, 2023 0
पुणे : शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली…
Fadanvis and lalit Patil

Lalit Patil : ललित पाटीलला अटक ! ‘आता अनेकांची तोंड बंद होतील’, फडणवीसांनी दिला इशारा

Posted by - October 18, 2023 0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता.…
Pune News

Pune News : पुण्यातील आणखी एका पबवर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Posted by - May 26, 2024 0
पुणे : एका पोर्शे कारनं दुचाकीवर असणाऱ्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना (Pune News) घडली होती. हा अपघात गेल्या रविवारी पुण्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *