Paris City

Paris City : जगण्याशी रोमांस करणारे पॅरिस

588 0

पॅरिस… फ्रेंचमध्ये पॅरि…सौंदर्य, रम्य, देखणेपणा, उत्साह अणि उल्हास… रस्तोरस्ती…फॅशनची नगरी असलेल्या संपूर्ण शहरात चकचकीत माणसं…संपूर्ण शहर जणू एखाद्या चित्रपटाच्या सेट लावल्यासारखं…पण दुबईसारखा त्यात कृत्रिमपणाचा लवलेश नाही. अनुभवायला येतो तो नैसर्गिक, रसरशीत जिवंतपणा… हेच पॅरिसचं खरं वैशिष्ट्य…

जगाची सौंदर्यनगरी असं नाव पॅरिस मिरवतंय. त्याचा अनुभव घेताना जगातले यच्चयावत पर्यटक या नगरीत हरखून जातात. माणसाला उत्तमोत्तम गोष्टींची आस असते. अधिक चांगलं मिळण्यासाठी, किमान ते पाहणे आणि अनुभवणं यासाठी मानवी धडपड सुरू असते. त्याचं उदाहरण पॅरिस आहे.

गरीब आणि श्रीमंत यांच्या भयानक विभाजनात 1789सालापर्यंत भरडलेला फ्रान्स, सरदार आणि उमरावांच्या ऐय्याशीच्या गर्तेत सापडून, धार्मिक ठेकेदारांच्या कचाट्यात रसातळाला जाऊन, शेवटी बंड करत आपले हक्क समजून घेत सर्वांना समान संधी देत, तीन शतकांत एक विकसित समाज म्हणून उदयाला आलेला हा देश माझ्यासाठी औत्सुक्याचा विषय आहे.

अमीर- उमरावांच्या ऐय्याशीपासून त्याच्या उलट आताची देखणी – सौदर्यपूर्ण जीवनशैली गाठण्यापर्यंतचा फ्रान्सचा प्रवास आहे. पॅरिस त्याचं प्रतिबिंब आहे.

हे समजून घेत पॅरिसची भेट हा अविस्मरणीय अनुभव आहे.

पॅरिस हे फ्रान्सच्या राजधानीचे शहर तसेच फ्रान्समधील सर्वात मोठे शहर आहे. सतराव्या शतकापासून युरोपमधील वित्त, वाणिज्य, फॅशन, विज्ञान आणि कला यांचे प्रमुख केंद्र बनलेलं पॅरिस शहर आजही या क्षेत्रांत कायम आहे. जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी हे एक शहर मानले जाते. पॅरिसला जगातील फॅशन आणि ग्लॅमरची राजधानी म्हटले जाते. येथे ऑर्ली, ब्यूवैस आणि पॅरिस-चार्ल्स डी गॉल ही तीन विमानतळे आहेत. यापैकी पॅरिस-चार्ल्स डी गॉल हे विमानतळ सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे युरोपमधील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. पॅरिस मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत सक्षम आहेत. येथील जास्तीत जास्त लोक सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करतात. यापैकी अनेकजण मेट्रो रेल्वेचा वापर करतात. पॅरिस मेट्रो ही मॉस्को मेट्रोनंतर युरोपमधील सर्वात व्यस्त मेट्रो प्रणाली आहे. 226.9 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यापैकी बहुतांश मार्ग भुयारी आहे. 19 व्या शतकात येथे राबवल्या गेलेल्या पथदिव्याच्या सुरुवातीच्या आणि व्यापक प्रणालीमुळे, ते ‘प्रकाशाचे शहर’ म्हणून ओळखले जाते.

दोन शतकांपूर्वी जगातलं त्या काळातील पहिलं सर्वात उंच बांधकाम (स्ट्रक्चर) म्हणून आयफेल टॉवरचे स्थान होते. पर्यटकांच्या दृष्टीने बांधलेली बहुदा ही पहिली वास्तू असेल. गेल्या शतकभरात जगभरात उंच इमारती आणि अशा बांधकामांची स्पर्धा सुरू झाली आहे. आयफेलच्याच धर्तीवर बांधलेल्या टोकियो टॅावरलाही मी भेट दिली. पण तिथं आयफेलसारखा फिल नाही. वास्तविक लंडन आय, श्राड (लंडन), वन ओ वन (तैवान), एम्पायर स्टेट(न्यूयॅार्क), हॅंागकॅंाग टॅावर, आणि दुबईच्या बुर्ज खलिफा या सर्व उंच इमारती आणि स्ट्रक्चरला मी भेट दिली. पण पॅरिसच्या आयफेल टॅावरची सर कोणालाच नाही. प्रत्येकाचं आपापलं वैशिष्टय जरूर आहे. पण आयफेलचा फिल अन् त्यावरून दिसणारे पॅरिस याची तुलना अन्य कशाशी करणं शक्य नाही.

त्यातही आयफेल टॅावरवर जाण्याची वेळ आपण योग्य निवडली तर बात काही औरच. संध्याकाळी उन उतरताना आणि दिवे लागताना आपण सर्वात शेवटच्या म्हणजे तिसऱ्या डेकवर असू तर पॅरिस नगरीचे सौंदर्य, सीन नदीचा आसमंत मावळतीच्या सूर्यकिरणात चमकत न्हात हळूहळू विद्युत प्रकाशात, दूरून पसरत चाललेल्या अंघारात उजळून स्वप्ननगरीसारखे भासू लागतो. हा नजारा पाहायला हवा. मी ही वेळ निवडून पॅरिस पाहिले. ते अवर्णनीय आहे.

जगभरातील कोटीवर लोक या टॅावरला भेट देऊन हे शहर न्याहाळतात.
निव्वळ पर्यटकांना आकर्षित करणारं असं स्ट्रक्चर आपल्याकडे आधुनिक काळात व्हायला हवं असा विचार आणि रुखरुख तिथून मनात आल्याशिवाय राहत नाही.

अभियंता गुस्ताव्ह आयफेल कंपनीने आयफेल टॉवरची रचना केली आणि बांधली. त्यामुळे त्यांच्या नावावरून आयफेल टॉवर हे नाव ठेवण्यात आले आहे. फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी फ्रान्समध्ये जागतिक मेळा आयोजित करण्यात आला होता.1187 ते 1889 या काळात याची निर्मिती करण्यात आली. ते सध्या फ्रान्सचे जागतिक सांस्कृतिक प्रतीक आहे. याची उंची ३३० मीटर म्हणजे जवळपास 81 मजली इमारती इतकी आहे. पर्यटकांसाठी टॉवरमध्ये तीन स्तर आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर रेस्टॉरंट्स आहेत.

माझ्या दृष्टीने पॅरिसमध्ये जागतिक स्तरावरचं खरं वैशिट्यपूर्ण स्थळ म्हणजे लूव्र म्युझियम. या संग्रहालयाची वैशिष्ट्ये आणि त्यातील वस्तू, चित्रे, शिल्पे यांची महती काय सांगावी? खऱ्या दर्दी रसिकाला चार – सहा दिवस पुरणार नाहीत इतकी या म्युझियमची ताकद आहे. 230 वर्षे जुन्या या संग्रहालयात लिओनार्दो दा विंचीच्या मोनालिसाच्या जगप्रसिद्ध चित्रापासून ते नेपोलियनच्या पोर्टेटपर्यंत शेकडो चित्रे, शेकडो शिल्पे, कलाकुसरीच्या वस्तू असा जणू खजिनाच इथं आहे. जवळपास तीन लाख 80 हजार वस्तू आणि 35 हजारांवर कलावस्तू -चित्रे यांची जपणूक या संग्रहालयात केलेली आहे. यासाठी जागा वापरली गेली आहे सुमारे सहा लाख 52 हजार चौरस फूट.

आपण आता भारतात यापेक्षा मोठे संग्रहालय उभे करण्याचे नियोजन करत आहोत. नवी दिल्लीत संसंदेशेजारी साऊथ आणि नॅार्थ ब्लाॅक या दोन्ही इमारतींचे क्षेत्र मिळून हे संग्रहालय उभे राहणार आहे. पंतप्रधान कार्यलय, संरक्षण मंत्रालय, अर्थ मंत्रालय यांची कार्यालये नव्या सेंट्रल व्हिस्टा इमारतीत हलविल्यानंतर या आकाराने जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयाचे काम सुरू होईल.

रेस्टाॅरंट… जगातला बहुदा प्रत्येकजण या शब्दाशी प्रचलित आहे. खाद्यपदार्थ विकत घेता येते अशी जागा म्हणजे रेस्टाॅरंट असा त्याचा फ्रेंच भाषेतला अर्थ आहे. 1765 मध्ये पॅरिसमध्ये एक सूप विक्रेत्याने पहिले रेस्टॅारंट सुरू केले. खाद्यपदार्थ विकण्याची ही सुरूवात होती. जगाच्या कानाकोपऱ्यात आज रेस्टांरंट्स आहेत. पॅरिसची ही मानवी संस्कृतीला एक अद्भुत देणगी आहे.

जगाला पहिला शेफ आणि मेन्यू कार्ड हेही पॅरिसची देणगी आहे. अतिशय रंजक इतिहास आहे याचा.

मारी- एन्तुआन करंम (इंग्रजी उच्चार) हा तो जगातला पहिला शेफ.
फ्रान्समध्ये राज्यक्रांतीच्या काळात दारिद्रय सामान्य जनतेच्या जीवनाचा भाग होतं. गरीब कुटुंबे आपल्या मुलांना जगण्यासाठी रस्त्यावर नशिबाच्या हवाल्याने सोडून देत.
आठ वर्षांचा असताना मारी याला त्याच्या वडलांनी असेच रस्त्यावर जगण्यासाठी सोडून दिलं. ते त्यांचं सोळावं अपत्य होतं.

बेकरीसारखे व्यवसाय पॅरिसच्या रस्त्यांवर सुरू झाले होते. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सरदार आणि उमरावांना सामान्य जनतेने उठाव करून देशोधडीला लावले होते किंवा मारून तरी टाकले होते. या श्रीमंतांच्या घरी स्वयंपाक करणारी आचारी मंडळी आता बेकार ठरली होती. रस्त्यांवर त्यांनी ठाण मांडत आपापल्या रेसिपी करायला आणि एकत्र येत त्याचा लोकांसाठी वापर करत नवी व्यवस्था उभी केली होती.

मारी असाच एकाकडे काम करून जगू लागला. पण त्याचा पुढे या विषयातला रस आणि कुतूहल जगात नवी व्यवस्था उभी करून गेला.

मारीने अशा सर्व आचाऱ्यांच्या जेवण बनवण्याच्या पद्धती एकत्र केल्या. त्या कशा बनवतात, काय काय टाकतात याची प्रथमच लेखी नोंद केली. त्यातून जगातलं पहिलं मेन्यू कार्ड तयार झालं.

हे सर्व करणारा मारी त्यातून जगातला पहिला शेफ बनला.

आजही जगात सर्वत्र शेफसाठी वापरले जाणारे स्वच्छ पांढरे कपडे आणि टोपी ही देखील त्याचीच देणगी आहे.
नेपोलियन बोनापार्ट पासून रशियाच्या झारपर्यंत अनेकांना मारी याने आपल्या हाताची पाककला दाखवली. त्यातून पूर्ण मेन्यू हाही प्रकार त्याने अस्तित्त्वात आणला.

पॅरिसला अशी आधुनिक खाद्यसंस्कृतीची परंपरा आहे.
त्यातूनच तुम्हाला या शहराच्या रस्तोरस्ती रेस्टांरठ्स अणि कॅफेज््ची रेलचेल दिसते.
बेकरीच्या उगमापाठोपाठ कॅफे म्हणून अवतरलेल्या रेस्टॅारंटच्या छोट्या आवृत्तीने जगात या फ्रेंच नावाने बस्तान बसवले आहे. पॅरिसमध्ये त्यामुळे कॅाफीचा दरवळ, बेकरी मालाचा सुंदर हवाहवासा वाटणारा सुवास गल्लोगल्ली भेटत राहतो.

पॅरिसमध्ये जाणारे भारतातीय पर्यटक भारतीय अन्नपदार्थांना प्राधान्य देतात. आता त्यामुळे भारतीय रेस्टॉरंट तिथे मुबलक प्रमाणात आढळून येतात. पण मला हे पॅरिसच्या वास्तव्यात लक्षात आलं की अनेक भारतीय जेवण देणारी रेस्टॉरंट्स ही भारतीयांची नसून पाकिस्तानी आणि बांगलादेशींची रेस्टॉरंट आहेत. भारतीय पर्यटक सर्वात जास्त प्रमाणात येत असल्यामुळे त्यांनी इंडियन फूड या ब्रँडखाली आपले रेस्टॉरंट्स चालवलेले आहेत. हेच मला रोममध्येही अनेक ठिकाणी दिसून आले.

फ्रेंच नागरिक आणि आपले नागरिक यांच्यात काम करणे आणि जीवनाचा आनंद घेण्याची पद्धत यात मोठी तफावत आणि गुणात्मक फरक मला जाणवला. आजही सोमवार ते शुक्रवार अशा पाच दिवसांचा कामाची पद्धत फ्रेंचांमध्ये आहे. कामाचे तास आणि कामाचा मोबदला यावर फ्रान्स सरकारचे अतिशय कठोर निर्बंध आहेत. शनिवार – रविवार फ्रेंच नागरिक शक्यतो काम करत नाहीत. आपल्या आयुष्यासाठी हे दोन दिवस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी म्हणजे हायकिंग, स्विमिंग, फिशिंग, सायकलिंग, आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवणे या गोष्टींसाठी ते आपला वेळ देतात. उलट पक्षी भारतीय उपखंडातल्या देशांमध्ये नागरिक हे जेवढे शक्य होईल तेवढे जास्त वेळ काम करतात. या दोन्हीचा फायदा आणि तोटा आपल्याला या आधुनिक काळात पहावा लागेल. फ्रेंचांना किंवा युरोपातल्या या सर्व विकसित झालेल्या देशांमधले नागरिक आता मेहनतीची कामं करण्यासाठी उपलब्ध नसतात किंवा खूप कमी काळ उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचं कौशल्य आणि कष्टाची क्षमता याच्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. याच्या उलट भारतीय नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रात बऱ्याच कौशल्यातून काम करत राहतात असं दिसून येतं. त्यामुळे भारतीय माणूस जगातल्या अनेक ठिकाणी स्किल वर्कर म्हणून पसंतीला उतरला आहे.

इ.स. 1789 ते इ.स. 1799 या कालखंडात फ्रान्स मध्ये क्रांती घडली. परिणामी येथे मोठ्या प्रमाणावर सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे घडली. हीच क्रांती इतिहासात फ्रेंच राज्य क्रांती म्हणून प्रसिद्ध आहे. जॉ जॅकवेस रुसो यांना या क्रांतीचे जनक म्हटले जाते. या राज्यक्रांतीमुळे, फ्रान्सवर अनेक शतके राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही, तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. पिळवणूक करणाऱ्या राजेशाहीचा, लोकशक्ती व शेतकऱ्यांनी एकत्रित लढा दिल्याने पराभव झाला. या लढ्यामुळे सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा अस्त झाला. जुन्या रूढीगत परंपरा, राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या मार्फत रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था संपुष्टात आणल्या गेल्या व त्या जागी समता , नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही आधुनिक मूल्ये अंगिकारली गेली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याकडे अस्पृशता निर्मुलनासाठी ऐतिहासिक लढा उभारला. अस्पृश्यांना महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी मनाई होती. त्यामुळे चवदार तळ्याच्या पाण्यासाठी बाबासाहेबांना सत्याग्रह करावा लागला होता. या सत्याग्रहाची तुलना बाबासाहेबांनी फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की, फ्रेंच जनतेला फ्रान्समधील राजाने कपटाने वागवले नसते तसेच वरिष्ठ प्रजेने विरोध केला नसता तर ही समाजक्रांती शांततेने पार पडली असती. त्याप्रमाणे आम्ही आमच्या न्याय्य हक्कासाठी लढत असताना आम्हाला विरोध करू नका, परकीय सरकारच्या मदतीने आमच्यावर चढाई करू नका. प्रतिपक्षाकडून शांतता राखल्यास आम्ही सुद्धा हा कार्यक्रम शांततेत पार पाडू असे त्यांनी स्पृश्य समाजाला आश्वासन दिले होते.

फ्रेंच राज्य क्रांतीचा अखेरचा साक्षीदार असलेला व्हर्सायचा किल्ला मी आवर्जून पाहिला. तो आज स्मृतीस्थळ म्हणून जतन केला आहे. या भव्य प्रासादात सोळावा लुई आणि त्याची राणी मेरी अन्न्तोनेत हिच्या वस्तू, पेंटीग्जपासून विविध वस्तू आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते.

राजसत्ता उलटून टाकताना फ्रेंच जनतेने सगळी जनता मुक्त आणि खरी सार्वभोम आणि समान असल्याची घोषणा करत नव्या जगाला ही नवी मूल्ये दिली.
पॅरिसमधल्या सौंदर्यस्थळांपेक्षा या मूल्यांवर फ्रेंच जनतेने खरी वाटचाल केली आहे. सर्वच जण सुंदर जगण्याचे हक्कदार आहेत. सर्वांना समान पातळींवर आणत मानवी मूल्ये जपली पाहिजेत आणि खरे आधुनिक झाले पाहिजे हा या देशाचा तीनशे वर्षे आग्रह आहे. तो त्यांनी अंमलात आणल्याचं सर्व क्षेत्रांत आपल्याला दिसतो.

त्या – त्या देशाची जनता कशा आहे आणि त्यांचा जीवनाकडं पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे हे सर्वात महत्त्वाचं. त्यातून तो समाज आणि देश घडतो. पॅरिसमध्ये फ्रेंच जनतेने जुन्या गोष्टी गाडून इमारतीच नाही तर नवी मूल्य व्यवस्था उभी केली. ती वाढवली. नव्या बांधणीसाठी जुन्या गोष्टी वापरत भेसळीची आणि विकृत व्यवस्था त्यांनी उभी केली नाही. पॅरिसच्या आसमंतात त्यामुळे वेगळी फिलिंग येते. फ्रेंच माणूस जीवनावर रोमॅंटिकली प्रेम करणारा आहे. पॅरिसमध्ये तो प्रत्यय सतत येत राहतो. त्यामुळे जगणे रोमँटिक करणाऱ्यांचं हे शहर आहे.

Share This News

Related Post

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

Posted by - March 3, 2022 0
लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल…

मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौर्‍यावर रवाना

Posted by - September 13, 2022 0
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी आज रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ही आहेत भारतामधील बंजी जंपचा आनंद देणारी पाच ठिकाणे

Posted by - May 18, 2022 0
मुंबई – काहींना शांत ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटायला आवडतो, तर काहींना साहसी खेळांमध्ये भाग घ्यायला आवडतो. अलीकडे, बंजी जंपिंग प्रत्येकाच्या…

भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत…

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद : INS विक्रांतचे आज जलावतरण ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ध्वजाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Posted by - September 2, 2022 0
केरळ : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांत या महाकाय जहाजाचे जलावतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *