Summer Health Tips

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीराला आहारापेक्षाही जास्त असते ‘या’ गोष्टींची गरज

190 0

उन्हाळा सुरु झाला आहे. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात वेगवेगळे त्रास होतात. जसं की उन्हाळी लागणे, फारच गरम होणे, फार घाम येणे, अस्वस्थ वाटणे इत्यादी… तर याउलट काही जणांना उन्हाळा हा ऋतू फारच आवडतो. कारण, या ऋतूमध्ये येणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि फळे त्यांना हवीहवीशी आणि खावीशी वाटतात. उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे खूप तहान लागते. आयुर्वेदनानुसार, उन्हाळा हा पित्ताचा ऋतू आहे. या काळात आपली पचनशक्ती मंदावते आणि भूक देखील कमी होते. त्यामुळेच, या तीन दोषांचे योग्य संतुलन राखण्यासाठी योग्य प्रकारचा आहार घेणं फार महत्त्वाचं ठरतं. उन्हाळ्यात, बहुतांश वेळेला आपण एरेटेड कोल्ड्रींक्स, आइस्ड टी आणि थंडगार पाणी यासारख्या थंड ड्रिंक्सना प्राधान्य देतो.

मात्र, या काळात तुम्ही अत्यंत थंड ड्रिंक्सचे सेवन करू नये कारण ते तुमच्या शरीरातील पाचक अग्नी विझवतात. तुम्ही तळलेले, जड किंवा अत्यंत मसालेदार किंवा खारट पदार्थ देखील टाळावे कारण ते पचायला जड असतात. त्याऐवजी, पचायला सोपे असलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून या उन्हाळ्यात तुम्ही हलके आणि आनंदी राहू शकाल. या उन्हाळ्यात शरीरात शीतलता ठेवण्याकरता अगदी काही गोष्टी आपल्या घरातच उपलब्ध असतात, त्यांचा वापर कसा करावा याबद्दल काही मुद्दे आपण आज पाहणार आहोत.

धणे
धणे हे भारतीय संस्कृतीतील पाककलेतील खूपच जुने सदस्य आहेत. यांची चव तर उत्तम असतेच पण यांचा आरोग्यासाठी खूप चांगला प्रभाव होताना दिसतो. धणे मूत्रल, दीपन गुणाचे असतात, ताप वगैरे कमी करायला मदत करतात, अन्नाची रुची वाढवतात, हृद्य असतात, अति प्रमाणात लागलेली तहान, जळजळ, उलटी वगैरेंचा भावना कमी करायला मदत करतात.

एकूणच काय तर उष्णेतेसाठी हा एक पॉवरपॅक मसाला आहे. धणे आपल्या दैनंदिन भाज्या, आमटी वगैरेंत तर नक्कीच वापरात ठेवावे व त्याचबरोबरीने धान्यक हिम बनवून नियमितपणे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा शरीरात जास्त प्रमाणात उष्णता जाणवत असणाऱ्यांनी, लघवीशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी, अति तहान लागणाऱ्यांनी घेण्याचा फायदा मिळू शकतो.

कृती : 10 ग्रॅम धणे अर्धबोबडे वाटून घ्यावे. त्यात साधारण 80-100 मिली पाणी घालून रात्रभर झाकून ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून त्यात साधारण एक चमचा खडीसाखर घालून, नीट ढवळून शक्यतो अनाशेपोटी प्यावे. एकदम पिणे न जमल्यास थोडे थोडे प्यायले तरी चालू शकते. धान्यक हिम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चालू शकते. यामुळे शरीरातील पित्त तर कमी होतेच, बरोबरीने स्रोतसांची शुद्धी होते, शरीराची ताकद वाढते, मधुमेही व्यक्ती, रजोनिवृत्तीच्या काळात हॉट फ्लशेशचा त्रास होणाऱ्या स्त्रिया वगैरेंसाठीही धान्यक हिम उपयोगी ठरते.

बडीशेप
ही शरीरात शीतलता आणण्यास मदत करते, चवीला मधुर असते. सहसा बडीशेप फक्त जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी म्हणून वापरली जातो. परंतु खरे तर ही पित्तदोषशामक, पचनशक्ती वाढवणारी, हृदयासाठी उत्तम, योनीशूल कमी करणारी, बल व ताकद वाढविणारी, उलटी-जळजळ-कृमी वगैंरेंत उत्तम असते. म्हणून बडीशेपेचा फक्त मुखशुद्धीसाठी वापर न करता बडीशेपेची पूड किंवा अख्खी बडीशेप पाककृतींसाठी वापरता येते.

वेलची
वेलचीचा वास व तिच्या काळ्या बिया यांच्याशी परिचित नसलेला क्वचितच कोणी भारतीय मनुष्य आपल्याला सापडेल. भारतीय पाककृतींमध्ये हिचा वापर खूप प्रमाणात होताना दिसतो. वेलची लघवी साफ व्हायला मदत करणारी, सर्दी-खोकला कमी करणारी, हृद्य, आहाराची रुची वाढविणारी, पचनाला मदत करणारी,
पित्तामुळे होणारा जळजळ कमी व्हायला मदत करणारी, उलटी-सतत शौचाला जाण्याची भावना होणे, मूळव्याध वगैरे त्रासांमध्ये मदत करणारी आहे. चहा करताना वेलचीची पूड टाकता येते. लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे वगैरेंतही वेलचीची पूड घालणे उत्तम असते. सहसा मसाले उष्ण गुणधर्माचे असतात परंतु आज पाहिलेले मसाले त्यातल्या त्यात कमी उष्णता तयार करतात, त्यामुळे यांचा वापर उन्हाळ्यात आवर्जून करावा.

ओले खोबरे
खोबऱ्याचा उपयोग आपल्याकडे हजारो वर्षांपासून केला जात आहे. खोबरे चवीला मधुर, शरीरात शीतलता आणणारे, बृंहण करणारे असते. नारळाचे पाणी तर शरीरात शीतलता आणणारे, पोटातील उष्णता कमी करणारे, अपचन तसेच अति तहान, थकवा, उचकी कमी करणारे, बस्तिशोधन (यूरिनरी ब्लॅडरचे शोधन) करणारे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून ओल्या खोबरे व शहाळ्याचे पाणी यांचा वापर करावा.

खरबुजाच्या बिया
आयुर्वेदानुसार या बिया मूत्रल, बल्य, चवीला मधुर, स्निग्ध, वृष्य व पित्त-वातदोष कमी करणाऱ्या आहेत. उन्हाळ्यात सूप, फ्रुट सॅलड तसेच भाज्यांच्या ग्रेव्हीसाठी यांचा वापर करणे उत्तम.

उन्हाळ्यात फळांचा वापर
द्राक्ष : द्राक्षांना आयुर्वेदात फळांचा राजा म्हटलेले आहे. द्राक्ष चवीला गोड, पौष्टिक, पित्तदोष, रक्तविकार व अति तहान यांना प्रतिबंध करणारी असतात. द्राक्ष लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालू शकतात. द्राक्षांचा रस घेणेही उत्तम असते.

डाळिंब : डाळिंब चवीला गोड, पचनाला मदत करणारे, पित्तशामक, हृदयासाठी उत्तम असतात. लघवीला आग-आग होत असल्यास डाळिंबाच्या रसात खडीसाखर घालून घोट घोट घेतल्याने फायदा होताना दिसतो. गर्भवती स्त्रियांना रक्ताची कमतरता असल्यास व फार उलट्या होत असल्यामुळे शरीरात ताकद कमी असल्यास डाळिंबाचा रस घेण्याचा उत्तम फायदा दिसू शकतो.

सफरचंद : सफरचंद चवीला गोड, वीर्याने शीत असते, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास याची मदत होऊ शकते. लहान मुलांना उन्हाळ्यात सफरचंदाचा गर देताना त्यात थोडी वेलचीची पूड टाकता येते.

संत्री, मोसंबी, कलिंगड : ही फळेही उन्हाळ्यात पित्तशमन करण्यासाठी तसेच अन्नाची रुची वाढवायला मदत करणारी असतात.

तसेही उन्हाळ्यात सगळ्यांनाच फारशी भूक लागत नाही, थंड पेये पिण्याकडे कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात फळांचा रस, उसाचा रस, लिंबाचे सरबत घेतल्यास फायदा मिळू शकतो. अशा प्रकारे ग्रीष्म ऋतूत निसर्गाने दिलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा नीट विचार करून आहारात समावेश केला तर आरोग्याला नक्की फायदा मिळू शकेल.

Share This News

Related Post

Tea

Health Tips : हिवाळ्यात रोज प्या ‘हा’ चहा, अनेक आजारांपासून होईल सुटका

Posted by - November 20, 2023 0
हिवाळ्यात (Health Tips) गरम चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. सकाळी एक कप चहा पिल्याने आपल्यात एक वेगळाच उत्साह निर्माण…
Weight Loss Tea

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Posted by - January 3, 2024 0
आजकालच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचे (Weight Loss Tea) प्रमाण खूप वाढले आहे. व्यस्त जीवनशैली, आहाराकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळे वाढत्या वजनाची…

‘आरोग्य हीच संपत्ती आहे ‘ : त्यासाठी ‘ या ‘ ९ सवयी अवश्य लावून घ्या

Posted by - August 29, 2022 0
‘आरोग्य हीच संपत्ती आहे’, तरीही आपल्यापैकी बहुतेकजण ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही दैनंदिन आरोग्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी कोणालाही आपल्या शरीरासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *