प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2021 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि तालिबान यांची तुलना केली होती, ज्यामुळे त्यांच्यावर मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता, तक्रारदाराने प्रकरण मागे घेतल्यामुळे अख्तर यांची निर्दोष सुटका झाली आहे.
काय होत हे प्रकरण?
2021 मध्ये जावेद अख्तर यांनी एक मुलाखत दिली होती, ज्यात त्यांनी RSS, विहिंप आणि बजरंग दल यांची उद्दिष्टं तालिबानसारखीच आहेत, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला. त्यांनी सांगितलं की, “तालिबान आणि RSS चे उद्दिष्ट एकच आहे. दोन्ही संघटनांच्या विचारधारा समान आहेत.
जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. अनेक राजकीय नेत्यांनी आणि समाजकांनी त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या विरुद्ध मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली.
मानहानीच्या तक्रार दाखल
2021 मध्ये मुंबईतील वकिल ॲडव्होकेट संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. वकिलांनी जावेद अख्तर यांच्या विरुद्ध IPC कलम 499 (मानहानी) आणि 500 (बदनामी) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत आरोप करण्यात आला होता की जावेद अख्तर यांच्या वक्तव्यामुळे RSS चे सदस्य आणि इतर संबंधित व्यक्तींना मानसिक आणि सामाजिक पातळीवर नुकसान पोहोचले आहे.
जरी या प्रकरणात वाद पेटला असला तरी, आता तक्रारदार आणि जावेद अख्तर यांच्यात सामंजस्य साधले गेले आहे आणि दोन्ही पक्षांनी आपापसात चर्चेतून प्रकरण मिटवण्याचे ठरवले. यानंतर तक्रारदाराने न्यायालयात अर्ज दाखल केला आणि खटला मागे घेतलाय. न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या सहमतीनंतर जावेद अख्तर यांना निर्दोष ठरवले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, “दोन पक्षांच्या सामंजस्यानंतर या प्रकरणात कोणतीही अधिक कारवाई करण्याची आवश्यकता नाही.”न्यायालयाच्या निर्णयानंतर जावेद अख्तर यांना मोठा दिलासा मिळाला, आणि हे प्रकरण आता शांत झाले आहे.