रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थीनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत रशिया आणि युक्रेन यांच्यात अचानक युद्ध सुरू झाल्याने ही विद्यार्थीनी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकली होती. भारतीय दुतावासाच्या मदतीने ही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यामुळे तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
अस्मा शफीक असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. या विद्यार्थीनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत भारत सरकारचे आभार मानले आहेत. अस्माने म्हटले आहे की, मी पाकिस्तानी आहे, युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आले होते. युद्धात मी कीवमध्ये अडकले. परंतु मला भारतीय दुतावासाने या संकटातून बाहेर काढले.मी आता लवकरच माझ्या मायदेशी परतेल. त्यासाठी मी भारत सरकार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.दरम्यान भारत सरकार भारतीय विद्यार्थ्यांसोबतच नेपाळ आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना देखील युक्रेनमधून सुरक्षीत बाहेर पडण्यास मदत करत आहे.हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना आता भारतात परत आणले जात आहे. त्यासाठी भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम चालवली जात आहे. या मोहीमेंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात परत आणले गेले आहे. युक्रेनमध्ये सध्या हवाई वाहतूक बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना बसमधून पोलंडच्या सीमेवर आणले जात आहे व त्यानंतर त्यांना विमानाने भारतात आणले जात आहे.