नागपूर : काल मध्यरात्रीपासून नागपुरात (Nagpur News) मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर आला आहे. नाग नदीच्या काठच्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर पाणी शिरल्यानं अनेक वाहनांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
मध्यरात्री नागपूर शहराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं आहे. वाडीत ढगफुटीजन्य पाऊस कोसळल्यानं नागनदीला पूर आला आहे. नागनदीकाठी घरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटितील अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं आहे.
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना…— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) September 23, 2023
नागपुरातील पूरस्थितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले आहे. फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.