VIVEK BHIMANVAR : MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सक्तीची...! - टॉप न्यूज मराठी

मुंबई: पुण्यातील एमपीएससी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन ते पुण्यात आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यावेळी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती.

या चर्चेवर एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला सक्तीच्या रजेवर पाठवले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही राहील. जय हिंद जय महाराष्ट्र.

विवेक भीमनवार यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत तर एमपीएससीच्या अलीकडच्या काही परीक्षांचे पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामध्ये आयोगाच्या अंतर्गत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. याच कारणामुळे विद्यार्थ्यांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आयोगाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी अध्यक्षांनी पदावरून बाजूला व्हावे अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.

या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यात सुरू झालेले आंदोलन नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि कोल्हापूरपर्यंत पोहोचले. आमदार रोहित पवार हे स्वतः पुण्यात विद्यार्थ्यांसोबत उपोषणाला बसल्याने या आंदोलनाला राजकीय रंगही आला. सोशल मीडियावर एमपीएससी या विषयावर हजारो पोस्ट व्हायरल झाल्या. अनेक माजी विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा करणारे वर्ग या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. या प्रकरणात आता कडक अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची एन्ट्री झाली आहे. त्यांची सचिवपदी नियुक्ती झाल्याने चौकशी अधिक पारदर्शक होईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. भीमनवार यांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने आता चौकशीला वेग येणार असून पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.