VINOD KAMBLI HEALTH UPDATE| विनोद कांबळीच्या मेंदूत ब्लड क्लॉट ‎ ब्रेन स्ट्रोकसह स्मृतीभ्रंशाचा धोका ! ‎बालमित्र सचिनसह माजी क्रिकेटपटू मदतीला ! ‎ - टॉप न्यूज मराठी

एकेकाळी वानखेडेवर ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडायचा, ज्याने शेन वॉर्नसारख्या दिग्गज फिरकीपटूलाही घाम फोडला होता, तोच विनोद कांबळी आज आयुष्याची सर्वात कठीण 'इनिंग' खेळतोय. 

पण ही लढाई प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध नाही, तर स्वतःच्या शरीराशी आणि विस्मृतीशी आहे. 

‎

‎मैदानावरची ती आक्रमक फलंदाजी, तो स्टाईलिश लूक आणि सचिनसोबतची ती ऐतिहासिक मैत्री...

 विनोद कांबळी म्हणजे भारतीय क्रिकेटमधलं एक वादळी नाव. पण सध्या हे नाव चर्चेत आहे ते त्यांच्या गंभीर आजारपणामुळे. कांबळी सध्या ब्रेन स्ट्रोकच्या छायेत आहेत. डॉक्टरांच्या मते त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ निर्माण झाली असून, त्यांची मानसिक स्थितीही नाजूक बनली आहे. 

‎

‎विनोद कांबळींच्या आजारपणापेक्षाही भयंकर आहे त्यांचा स्मृतीभ्रंश . त्यांचे जवळचे मित्र मार्कस कुटो यांनी 

काळजाला चटका लावणारी माहिती दिली आहे. विनोदने मद्यपान सोडलंय, पण त्यांना सिगारेटचं व्यसन सुटत नाहीये. स्मृतीभ्रंशामुळे ते वारंवार विसरतात की त्यांना सिगारेट ओढायची नाहीये. इतकंच नाही, तर ते रस्त्यावर अनोळखी लोकांकडे सिगारेट मागतात. लोक 'मदत' म्हणून त्यांना सिगारेट देतात, पण हीच मदत त्यांच्यासाठी विष ठरत आहे.

‎

‎अशा पडत्या काळात त्यांचा बालमित्र सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आहे. 

'शारदाश्रम'मध्ये सुरू झालेली ही मैत्री आजही तुटलेली नाही. सचिनने स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवून विनोदच्या उपचारांचा सर्व खर्च उचलला आहे.

 सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी एकत्र येऊन एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला असून, त्याद्वारे विनोदच्या उपचारांसाठी निधी जमा केला जात आहे.

‎

‎एक काळ असा होता की आर्थिक चणचणीमुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातील उपचार अर्धवट सोडावे लागले होते. पण आता चाहत्यांच्या प्रार्थना फळाला येत आहेत.कधी फर्निचरचा आधार घेऊन चालणारे

 विनोद आता काठीच्या साहाय्याने चालू लागले आहेत नुकतंच त्यांनी एका जाहिरातीचं शूटिंगही पूर्ण केलंय, जे त्यांच्या आर्थिक आणि मानसिक प्रकृतीसाठी सकारात्मक पाऊल मानलं जात आहे.

‎विनोद कांबळी सध्या आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवत आहेत. मैदानावर अनेकदा आऊट झाल्यावरही प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या खेळाडूने, आयुष्याच्या या खेळपट्टीवर 'नॉट आऊट' राहावं, हीच तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.