पुणे : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज, 22 ऑगस्ट रोजी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या 'छात्रों की गुंज' या देशव्यापी विद्यार्थी संवाद मोहिमेचा चौथा टप्पा आज पुण्यात होत आहे. हा कार्यक्रम SSPMS (AISSMS) कॉलेज ग्राऊंड, RTO चौक येथे सायंकाळी 4.30 ते 9.30 या वेळेत पार पडतो आहे. ही आवृत्ती फक्त मुलींसाठी - 'सावित्रीच्या लेकींसाठी' ठेवण्यात आली आहे. सकाळी विमानतळावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
राहुल गांधी तरुणींशी थेट संवाद
या कार्यक्रमात राहुल गांधी तरुणींशी थेट संवाद साधणार असून पेपरफुटी, NEET परीक्षेतील गोंधळ, शिक्षणाची वाढती फी, महिलांची सुरक्षा आणि बेरोजगारी या विषयांवर चर्चा होणार आहे. पोलिसांनी 30 अटींसह परवानगी दिली असून 8 ते 10 हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत.
दरम्यान, या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच आणले जात असल्याची टीका केली आहे, तर भाजपने विद्यार्थ्यांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप केला आहे.