Ustad Bale Khan Music Festival 2026’ : उस्ताद बाले खान संगीत महोत्सवात सितार पंचक, बहुरंग नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली.... - टॉप न्यूज मराठी

पुणे : सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ, पुणे व एफटीआयआय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव २०२६’ ला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात देशातील नामवंत कलाकारांच्या गायन, वादन, जुगलबंदी आणि नृत्याविष्कारांनी रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी दिली. महोत्सवातील सांगतापर झालेले पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांचे भारदस्त गायन आणि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सादर झालेला ‘सितार पंचक’ हा कार्यक्रम लक्षणीय ठरला. या कार्यक्रमामध्ये धारवाड घराण्याचे नामवंत सतारवादक उस्ताद छोटे रहिमत खान, उस्ताद रफीक खान, उस्ताद शफीक खान, रईस बाले खान आणि मन्सूर खान यांनी एकत्रित सितारवादन केले. या स्वरमयी पर्वणीने रसिकांना एक आगळावेगळा आणि अलौकिक सांगीतिक अनुभव दिला.

महोत्सवाची सांगता किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांच्या प्रभावी गायनाने झाली. त्यांनी शुद्ध कल्याण, रामदासी मल्हार, बसंत बहार आणि सोहोनी या रागांतील बंदिशी, तराणा, कन्नड वचन तसेच मराठी व कन्नड भजने सादर केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शिवराज पाटील व नागनाथ नागेश (तानपूरा) तसेच मकरंद बद्रायणी (ताल) यांनी साथ केली. या तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप उस्ताद बाले खान यांच्या राग भैरवीतील सतारवादनाच्या ध्वनिमुद्रणाने करण्यात आला. त्याआधी सायंकाळच्या सत्रात अभिषेक बोरकर आणि मोहसीन खान यांच्या सरोद–सितार जुगलबंदीने राग भीमपलासमधील आलाप, जोड, गत आणि रंगतदार सवाल-जवाबातून विशेष दाद मिळवली. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी यांनी साथ केली. त्यानंतर विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी राग मारवा आणि मियाँ की मल्हारमधील सादरीकरणासह ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ या अभंगाने वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला पांडुरंग पवार (तबला), अभिनय रावंडे (हार्मोनियम), अनुराधा मांडलिक व जान्हवी गद्रे (तानपूरा) तसेच मकरंद बद्रायणी (ताल) यांनी साथ दिली.

 

महोत्सवाच्या अंतिम दिवशीच्या सकाळच्या सत्रात उस्ताद अर्शद अली खान यांनी राग मियाँ की तोडी आणि देसकारमधील ख्याल गायन सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शाश्वती चव्हाण व श्रावणी विरोकर (तानपूरा) तसेच मकरंद बद्रायणी (ताल) यांनी समर्पक साथ दिली. त्यानंतर पं. जयतीर्थ मेवुंडी आणि पं. प्रवीण गोडखिंडी यांच्या गायन–बासरी जुगलबंदीने राग अहिर भैरव, वृंदावनी सारंग तसेच हिंदी, मराठी आणि कन्नड भक्तिगीतांमधून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाला अजिंक्य जोशी (तबला), नरेंद्र नायक (हार्मोनियम), श्रीहरी आणि यशद (तानपूरा) तसेच मकरंद बद्रायणी (ताल) यांनी साथ दिली.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. सुधाकर चव्हाण यांनी राग मधुवंतीमधील बंदिशी आणि मराठी भजन सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यांच्या सादरीकरणाला ऋषिकेश जगताप (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), सिद्धेश्वर उंदळकर (पखवाज), शाश्वती चव्हाण, अभयसिंह वाघचौरे आणि श्रावणी विरोकर यांनी साथ केली. त्यानंतर पं. अभय रुस्तम सोपोरी यांनी राग कौशिक रंजनीमधील संतूरवादनातून आपल्या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली सादर केली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर साथ केली. दिवसाच्या अखेरीस पं. रघुनंदन पणशीकर यांनी राग तिलक कामोदमधील सुरेल सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाच्या उद्घाटनदिनी धारवाड घराण्यातील उस्ताद छोटे रहिमत खान, उस्ताद रफीक खान, उस्ताद शफीक खान, रईस बाले खान आणि मन्सूर खान यांच्या आगळ्यावेगळ्या ‘सितार पंचक’ सादरीकरणाने महोत्सवाची सुरुवात झाली. राग मारू बिहाग आणि सोहोनीमधील त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या सादरीकरणाला हेमंत जोशी आणि सोहम गोराणे यांनी तबल्यावर समर्थ साथ दिली. त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते निरुपमा आणि राजेंद्र तसेच अभिनव टीम, बेंगळुरू यांनी सादर केलेल्या ‘बहुरंग’ या वैशिष्ट्यपूर्ण नृत्याविष्कारात कथक, करणा आणि नाट्यशास्त्रातील हालचालींचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह, कन्नड संघ पुणेचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्षा इंदिरा सालियन, सचिव मालती कलमाडी, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान, एफटीआयआयचे कुलसचिव प्रतीक जैन, टेन्थपिन मॅनेजमेंट कन्सल्टंट्सचे संस्थापक मायकेल श्मिट तसेच सुहाना बसंत फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रईस खान उपस्थित होते. महोत्सवाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.