पुणे - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी 10 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पदवीधर मतदार संघात 741 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. या मतदार संघात एकूण 3 लाख 88 हजार 19 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 2 लाख 56 हजार 445, स्त्री 1 लाख 31 हजार 553 आणि तृतीयपंथी 21 मतदार आहेत. सकाळी 8 ते 10 या दोन तासात एकूण 34 हजार 363 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये पुरुष मतदार 26 हजार 204, स्त्री मतदार 8 हजार 158 आणि तृतीयपंथी 1 मतदाराचा समावेश आहे. टक्केवारीचा विचार केला तर पदवीधरमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत 8.86 टक्के मतदान झाले आहे.
दुसरीकडे पुणे शिक्षक मतदार संघात 310 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या मतदार संघात एकूण 61 हजार 940 मतदार आहेत. त्यात पुरुष 37 हजार 768, स्त्री 24 हजार 164 आणि तृतीयपंथी 8 मतदार आहेत. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 8 हजार 17 मतदारांनी मतदान केले आहे. यात पुरुष 5 हजार 590 आणि स्त्री 2 हजार 427 मतदार आहेत. शिक्षक मतदार संघात सकाळी 10 वाजेपर्यंत 12.94 टक्के मतदान झाले असून पदवीधरच्या तुलनेत शिक्षक मतदार संघात जास्त टक्केवारीने मतदान झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान दि रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे शाळेतील मतदान केंद्रावर विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन केले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागात ठिकठिकाणी मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून मतदानाची टक्केवारी दुपारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.