मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट आणि जहरी टीका केली आहे. सुनावणी सुरू असताना "गद्दारांना" भेटण्यामागचा हेतू काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडिया, कोर्टातील सुनावणी आणि तरुणांच्या मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या कोर्टाची बाजी सुरू आहे. कोर्टात सुनावणी चालू असताना या गद्दारांना भेटण्याचं कारण काय? हा संदेश कुणाला आहे? कोर्टाला धमकी देत आहेत का? की अमित शाह यांना धमकी देत आहेत?" त्यांनी हा थेट सवाल उपस्थित करत केंद्राच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली.
कोरोना काळाची आठवण करून देत ते म्हणाले, "त्या काळात मी फेसबुक लाइव्हद्वारे राज्याशी संवाद साधायचो. त्यावेळी आम्हाला उपदेश दिला जायचा की फेसबुकवरून सरकार चालत नाही. पण आज त्यांच्यावर इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे. त्यांची अवस्था एवढी बिकट झाली आहे."
"पंतप्रधान तरुणांना प्रत्यक्ष भेटत नाहीत. मध्यरात्री इन्स्टावरून 'फ्रेंड्स' म्हणून संदेश देतात. एक बातमी आली होती, पण किती चॅनलने ती दाखवली माहित नाही," अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मोदींनी गद्दारांना सांगितलं 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे'. स्वामी समर्थांचे वाक्य आहे ते. मग मोदी आता नवे स्वामी झाले आहेत का? तरुणाई त्यांची निंदा करत आहे, पण तरीही गद्दारांना धीर दिला जातोय. "गद्दार वॉशिंग मशीनमध्ये गेले तरी गद्दारीचा डाग जात नाही. देशातील तरुण न्याय-हक्कासाठी आंदोलन करत आहेत, त्यांना भेटायला वेळ नाही. पण बेशरमपणे गद्दारांना भेटून 'मी तुमच्या पाठिशी आहे' असं सांगतात," अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
"काँग्रेसने एवढ्या शिव्या कधीच खाल्ल्या नसतील, जेवढ्या मोदी-शाहांच्या वाट्याला आल्या आहेत. तरुणांना भेटायला वेळ नाही, पण शाह सेना स्थापन करणाऱ्या गद्दारांना भेटायला वेळ आहे. अमित शाह मुंबईत होते, तेव्हा गद्दारांनी त्यांचं स्वागत केलं," असंही ते म्हणाले.
"बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर का येते? कुणाला संदेश द्यायचा आहे? सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे शिंदे गट टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या आहेत. मग हे वाक्य त्यांच्यासाठीच आहे का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आमचे 6 खासदार फोडून महिना झाला आहे. तरीही लोकसभा अध्यक्षांनी अपेक्षित निर्णय दिला आहे," असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने वाद चव्हाट्यावर आले आहेत. कोर्टातील प्रलंबित प्रकरणे, पक्ष फोडाफोडी आणि सोशल मीडियाच्या राजकारणावरून त्यांनी थेट पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना धारेवर धरले आहे.
सध्या भाजपकडून या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.