मुंबई : शिवसेनेचे Shivsena नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टात नुकतीच महत्त्वाची सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाप्रमुख आणि विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले.
1. चिन्हाबत ठाकरेंचा विश्वास
उद्धव ठाकरे म्हणाले की सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे खरे चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळेल असा विश्वास आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी काल न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडली. जर न्यायालयाने चिन्ह एका गटाला दिले नाही तर ते गोठवले जाईल, असा पर्यायही चर्चेत आहे असे त्यांनी सांगितले.
2. संघटनात्मक बांधणीवर भर
2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून 3 वर्षे असली तरी आत्तापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना ठाकरेंनी दिल्या. प्रत्येक जिल्हा आणि मतदारसंघात बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्ते सक्रिय करा. जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले.
3. एसआयआर प्रक्रियेकडे लक्ष देण्याचे आदेश
मतदार यादीतील नावांची पडताळणी म्हणजेच SIR प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले. चुकीची नावे कमी करा आणि नव्या मतदारांची नोंदणी वाढवा. ही प्रक्रिया यशस्वी झाली तरच निवडणुकीत फायदा होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
4. काम न करणाऱ्यांनी पद सोडाव
ज्यांना दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी स्वखुशीने पद सोडावे. त्यांची जबाबदारी इतर सक्षम कार्यकर्त्यांकडे दिली जाईल असे ठाकरेंनी ठणकावले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निष्क्रिय लोकांना बाजूला करण्याचे संकेत त्यांनी दिले.
पार्श्वभूमी काय ?
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. संख्याबळ जास्त असल्याने निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. त्याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तेव्हापासून ही केस सुरू आहे. बैठकीच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आणि जनतेतील विश्वास पुन्हा मिळवण्याचे आवाहन केले.