TUKARAM MUNDHE : भेसळविरोधी धडक कारवाई; बंगळुरूतील मोठ्या हॉटेलची पोलखोल, पुढील टार्गेट दारू माफिया - टॉप न्यूज मराठी

बंगळुरु : अन्नात भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्यभरात धडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे आता देशाच्या सिलिकॉन व्हॅलीतही गाजत आहेत. महाराष्ट्रातील कारवाईनंतर आता कर्नाटकमध्येही त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. आणि या तपासणीतून जे समोर आले आहे ते धक्कादायक आणि संतापजनक आहे. आरोग्य मंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली अन्न व औषध प्रशासनाच्या 30 विशेष पथकांनी बंगळुरू शहरातील 26 मोठ्या हॉटेलांची अचानक तपासणी केली. यामध्ये थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेलचाही समावेश होता. सामान्य माणसाला जिथे स्वच्छता आणि दर्जेदार अन्न मिळेल असा विश्वास असतो, त्याच पंचतारांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरातून जे दृष्य दिसले त्याने अधिकाऱ्यांनाही हादरा बसला.

पंचतारांकित हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

छापेमारीदरम्यान एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात खराब आणि अस्वच्छ अन्नसाठा आढळून आला. तपासणी पथकाला तेथून तब्बल 207 किलो खराब झालेल्या भाज्या, 32 लीटर आंबट झालेले दूध आणि इतर सुमारे 250 किलो साठवलेले खाद्यपदार्थ* जप्त करण्यात आले. काही भाज्यांना तर स्पष्टपणे बुरशी लागली होती. तरीही त्या ग्राहकांना वाढण्यासाठी तयार ठेवण्यात आल्या होत्या. 

स्वयंपाकघराची अवस्था पाहून अधिकारीही चक्रावले. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचा फज्जा उडालेला दिसला. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच जागी आणि चुकीच्या पद्धतीने साठवले होते. अनेक पदार्थांची लेबलिंग चुकीची होती आणि काही खाद्यपदार्थांची मुदतही संपली होती. स्वच्छते ऐवजी तिथे घाणीचे साम्राज्य पसरले होते. ही कारवाई केवळ एका हॉटेलपुरती मर्यादित नव्हती. इतर हॉटेलमध्येही तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या. साठवणुकीच्या पद्धती अत्यंत चुकीच्या होत्या. अन्नपदार्थ अनेक दिवसांपासून उघड्यावर आणि बेकायदेशीर पद्धतीने ठेवले होते. 

प्रशासनाने यावेळी विविध पदार्थांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हळद पावडर, खाद्यतेल, चहा पावडर, टोमॅटो सॉस, लिंबाचा रस, काजू, पापड, मसाला पावडर आणि काळी मिरी या सर्वांच्या नमुन्यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. पनीर, दूध आणि दह्यातील भेसळीच्या तक्रारी आधीच वाढल्या आहेत. त्यामुळे या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

पुढील टार्गेट दारू माफिया - तुकाराम मुंडे

या कारवाईनंतर तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या मुलाखतीत पुढील धोरण स्पष्ट केले. ते म्हणाले, "आमच्याकडे दारूतील भेसळ आणि बनावट दारूच्या अनेक तक्रारी येत आहेत. लोक थेट बारमधून बसून आम्हाला फोन करतात. त्यामुळे आता आमचे पुढील लक्ष या दारू माफियांवर असणार आहे." 

महाराष्ट्रात भेसळविरोधी मोहीम यशस्वी केल्यानंतर आता बंगळुरूमध्येही त्याच धर्तीवर कारवाई सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तुकाराम मुंडे यांच्या या निर्भीड आणि पारदर्शक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या मोठ्या हॉटेलांच्या आतले हे विदारक वास्तव समोर आल्यानंतर ग्राहकांनीही खाण्यापिण्याबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.