TOP NEWS PROPERTY : घर आणि फ्लॅटची कागदपत्रे चोरीला गेल्यास हक्क अबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले - टॉप न्यूज मराठी

घर, जमीन किंवा फ्लॅटची नोंदणी ही केवळ कागदाची प्रत नसते, तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी आणि मालकी हक्काचा मुख्य कायदेशीर पुरावा असते. अशा परिस्थितीत, जर ही मूळ कागदपत्रे अचानक हरवली किंवा चोरीला गेली, तर अनेक नागरिक घाबरून जातात. मालमत्ता हातची जाईल किंवा भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होतील, अशी भीती लोकांना सतावू लागते. परंतु, कायदेतज्ज्ञांच्या मते, अशा प्रसंगी घाबरून न जाता तात्काळ योग्य कायदेशीर पावले उचलल्यास मालमत्तेचे पूर्ण संरक्षण करता येते.

जर तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे गहाळ झाली असतील  तर, तात्काळ पोलीस तक्रार नोंदवा, वृत्तपत्रात सार्वजनिक नोटीस/पब्लिक नोटिस द्या, हाऊसिंग सोसायटीकडून शेअर सर्टिफिकेट मिळवा, नोटरीकृत प्रतिज्ञापत्र/अफडावीट तयार करा, उप-निबंधक कार्यालयातून प्रमाणित प्रत (Certified Copy) मिळवा या महत्त्वाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्या लागतात:

कागदपत्रे हरवल्याचे समजताच सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन प्रथम माहिती अहवाल किंवा मिसिंग तक्रार नोंदवा. यामध्ये कागदपत्रे कशी आणि कुठे हरवली, याचा स्पष्ट उल्लेख असावा. या तक्रारीची एक प्रमाणित प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवा, कारण पुढील प्रक्रियेत हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरतो. तक्रार नोंदवल्यानंतर, एक इंग्रजी आणि एका स्थानिक भाषेतील (मराठी) नामांकित दैनिक वृत्तपत्रात मालमत्ता कागदपत्रे हरवल्याची सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. या नोटीसमध्ये मालमत्तेचा संपूर्ण पत्ता, कागदपत्रांचा तपशील आणि मालकाचे नाव असणे अनिवार्य आहे. पुढील १५ दिवसांत कोणाचाही आक्षेप न आल्यास ही नोटीस कायदेशीर आधार बनते.

जर तुमची मालमत्ता एखाद्या नोंदणीकृत हाऊसिंग सोसायटीमध्ये असेल, तर पोलिसांमधील एफआयआर आणि वृत्तपत्रातील नोटीसची प्रत जोडून सोसायटीकडे अर्ज करा. सोसायटीची कमिटी तुमच्या अर्जाची शहानिशा करून तुम्हाला 'डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट' आणि ना-हरकत प्रमाणपत्र/एनओसी जारी करते. पुढील टप्प्यात स्टॅम्प पेपरवर एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र (Undertaking) तयार करून ते नोटरीकडून प्रमाणित करून घ्यावे लागते. या प्रतिज्ञापत्रात हरवलेल्या मूळ कागदपत्रांची संपूर्ण माहिती, पोलीस तक्रार क्रमांक आणि वृत्तपत्रातील जाहिरातीचा संदर्भ देणे बंधनकारक आहे.

शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे, ज्या उप-निबंधक कार्यालयात तुमच्या घराची मूळ नोंदणी झाली होती, तिथे जाऊन दुबार प्रमाणित प्रतीसाठी (Certified Copy of Sale Deed) अर्ज करावा. यासाठी ठराविक सरकारी शुल्क भरावे लागते. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रार ऑफिसकडून मिळणारी ही प्रमाणित प्रत कायदेशीरदृष्ट्या मूळ कागदपत्रांइतकीच वैध मानली जाते.

मालमत्तेचे मूळ दस्तऐवज हरवणे ही गंभीर बाब असली तरी डिजिटल युगात 'महाभूलेख' किंवा 'आयजीआर महाराष्ट्र' च्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्ही तुमच्या मालमत्तेचा ऑनलाइन इंडेक्स-२ किंवा ७/१२ उतारा तपासून प्राथमिक पडताळणी करू शकता. निष्काळजीपणा न करता तात्काळ या कायदेशीर मार्गांचा अवलंब केल्यास तुमची मालमत्ता पूर्णपणे सुरक्षित राहते.

#घरचीकागदपत्रे  #फ्लॅटचीकागदपत्रे  #मालमत्ताकागदपत्रे #खरेदीखत #७बारे #सातबारा #घरखरेदी #फ्लॅटखरेदी #रेरा #माहितीघरखरेदीची #PropertyDocuments #FlatDocuments #HomeBuyingTips #RealEstateMarathi #LegalDocuments #SaleDeed #712Utara #PropertyRegistration #RERAMaharashtra  #HomeLoanDocuments

#topnewsmarathi #topnews #topstory #top #latestmarathinews #ताज्याबातम्या #महाराष्ट्राच्याबातम्या _बातम्या #ताज्या_बातम्या