केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची (पेन्शनर्स) दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. दिवाळीच्या ऐन तोंडावर केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) आणि महागाई सवलतीत (DR) ३ टक्के वाढ जाहीर करून लाखो कुटुंबांना मोठी गूड न्यूज दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे ही घोषणा केली.
सरकारच्या या निर्णयामुळे ४८ लाख विद्यमान केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार ही वाढ करण्यात आली असून, ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत थकीत रकमेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वाढ जुलैपासून लागू असल्याने जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासोबत एकरकमी मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसा खेळणार आहे.
महागाई भत्ता वाढवण्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तब्बल २९,२०० कोटी रुपयांच्या विविध कल्याणकारी आणि औद्योगिक योजनांना मंजुरी दिली आहे. मेक इन इंडिया आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि योजनांसाठी ७,४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर. देशात क्रीडा साहित्याच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना बळ देण्यासाठी १,८०० कोटी रुपयांची विशेष मंजुरी.
केंद्राच्या या दुहेरी निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळाला असून, विविध क्षेत्रांतील कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे देशांतर्गत रोजगाराला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
#topnewsmarathi #topnews #topstory #top #latestmarathinews #ताज्याबातम्या #महाराष्ट्राच्याबातम्या _बातम्या #ताज्या_बातम्या