TOP NEWS BUSINESS : भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी 'ट्रॅक्टरनेक्स्ट' मार्केटप्लेस सज्ज - कृषी उपकरण खरेदी आता अधिक सोपी - टॉप न्यूज मराठी

कृषी यांत्रिकीकरण आणि ग्रामीण उपकरण क्षेत्रातील पुढच्या पिढीचे अ‍ॅग्री-टेक व्यासपीठ 'ट्रॅक्टरनेक्स्ट' चे अनावरण ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन (TMA) चे अध्यक्ष आणि कृषी यंत्रसामग्री उद्योगातील दिग्गज श्री. जी. एस. ग्रेवाल यांच्या हस्ते पुण्यात पार पडले. शेतकरी, ग्रामीण उद्योजक आणि खरेदीदारांना उपकरणांची माहिती सुलभपणे मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा, यासाठी हे व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण झपाट्याने बदलत असताना, शेतकरी आणि ग्रामीण व्यावसायिकांना आता उपकरणांची उपयुक्तता, कार्यक्षमता, तंत्रज्ञान, परिचालन खर्च आणि दीर्घकालीन मूल्य या निकषांवर मूल्यमापन करावे लागते. ट्रॅक्टरनेक्स्ट ही गरज ओळखून एका सामाईक डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून उत्पादनांची माहिती, तुलना साधने आणि संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे.

यावेळी बोलताना ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन’चे (टीएमए) अध्यक्ष श्री. जी. एस. ग्रेवाल म्हणाले, “भारतामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला मोठी संधी आहे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, त्याची उपलब्धता आणि योग्य उपकरणांची निवड याबाबत जागरूकता वाढवणे महत्त्वाचे आहे. आज शेतकऱ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत; मात्र आपल्या गरजेनुसार योग्य तंत्रज्ञान निवडणे हे अनेकदा आव्हानात्मक ठरते. विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणे, विविध पर्यायांची तुलना करण्यास मदत करणे आणि योग्य उपायांपर्यंत पोहचवण्यासाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अंतिमतः कृषी यांत्रिकीकरणाचा खरा उद्देश शेतकऱ्यांची उत्पादकता, कार्यक्षमता आणि आर्थिक उत्पन्न वाढवणे हाच आहे.”

ट्रॅक्टरनेक्स्ट या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश कृषी उपकरणे उत्पादक कंपन्या (OEMs) आणि पुरवठादारांना डिजिटल ओळख मिळवून देणे, त्यांना प्रादेशिक बाजारपेठांमध्ये पोहोचवणे आणि थेट ग्राहकांशी जोडणे हा आहे. उपकरणांचा शोध, स्थानिक भाषेतील संवाद आणि बाजारपेठेतील सहभाग या सर्वांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याचा या प्लॅटफॉर्मचा मानस आहे.

ट्रॅक्टरनेक्स्ट’च्या संकल्पनेविषयी बोलताना संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विष्णू धस म्हणाले, “भारतातील शेतकरी आणि ग्रामीण समुदायासाठी उपकरणांची खरेदी अधिक सुलभ आणि माहितीपूर्ण करणे, हेच ट्रॅक्टरनेक्स्टचे ध्येय आहे. मग ते अ‍ॅग्री ड्रोन, ट्रॅक्टर, शेती अवजारे, बुलडोझर असो किंवा इतर विशेष उपकरणे, प्रत्येक गुंतवणूक शेतकऱ्यासाठी मोठी असते. त्यामुळे योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रॅक्टरनेक्स्टच्या माध्यमातून आम्ही एक विश्वसनीय व्यासपीठ तयार करत आहोत, जे खरेदीदारांना योग्य पर्याय समजून घेण्यास आणि उत्पादक कंपन्यांना ग्रामीण भारताशी जोडण्यास मदत करेल.”

या कार्यक्रमास कृषी यंत्रसामग्री उद्योग, उपकरण वितरण, कृषी-तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री. जी. एस. ग्रेवाल लिखित ‘लीडर अ‍ॅज अ कोच’ (Leader as a Coach) या पुस्तकाचेही सादरीकरण करण्यात आले. हे पुस्तक त्यांच्या व्यापक नेतृत्व अनुभवावर आधारित असून, प्रशिक्षण, सक्षमीकरण आणि निरंतर शिकण्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करते.

#topnewsmarathi #topnews #topstory #top #latestmarathinews #ताज्याबातम्या #महाराष्ट्राच्याबातम्या _बातम्या #ताज्या_बातम्या