The Ministry of Railways : भारतीय रेल्वेच्या परिसरात अनधिकृत प्रवेश करणे, विनातिकीट प्रवास करणे, बेकायदेशीर फेरीविक्री, धूम्रपान करणे, घाण पसरवणे तसेच नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे अशा रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आता रेल्वे सुरक्षा दल (RPF) चे निरीक्षक थेट दंड वसूल करू शकणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने The Ministry of Railways जन विश्वास अधिनियम अंतर्गत नियमांमध्ये सुधारणा करून आरपीएफला हा अधिकार दिला आहे. सध्या पूर्व मध्य रेल्वेमध्ये ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली असून निरीक्षकांना दंडाच्या अधिकृत पावत्या देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
किरकोळ प्रकरणांमध्ये आता दीर्घ कायदेशीर प्रक्रिये ऐवजी घटनास्थळीच कारवाई करता येणार आहे. जन विश्वास अधिनियम लागू झाल्यापासून आतापर्यंत ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून वाढवून ५०० रुपये करण्यात आली आहे.
त्याचबरोबर जन विश्वास अधिनियमांतर्गत तिकीट तपासनीस (टीटीई) यांनाही बेकायदेशीर फेरीविक्री, धूम्रपान आणि घाण पसरवणाऱ्यांवर दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.