भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथे मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली आहे. येथील चार मजली जुनी कोहिनूर इमारत रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असण्याची भीती असल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत आधीच अतिशय धोकादायक स्थितीत होती आणि भिवंडी निझामपूर महापालिकेने तिला नोटीस बजावली होती. इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावरील खांबांची दुरुस्ती गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास इमारतीला मोठे तडे गेले आणि इमारत एका बाजूला झुकू लागली. स्थानिकांनी याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर रात्री आठच्या सुमारास पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढले होते. मात्र काही लोक आपले आवश्यक सामान आणि कागदपत्रे आणण्यासाठी पुन्हा आत गेले असतानाच मोठा आवाज होऊन इमारतीचा संपूर्ण भाग खाली कोसळला.
घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासूनच जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यातून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना इंदिरा गांधी रुग्णालय आणि सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 6 ते 7 जण अडकले असावेत असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोहिनूर इमारतीच्या आजूबाजूच्या इतर दोन जुन्या इमारतीही तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. घटनास्थळापासून 200 मीटर परिसर बॅरिकेड करून सामान्य नागरिकांना आत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि भिवंडी महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यांनी सांगितले की इमारत धोकादायक असतानाही काही लोक आत का गेले याचा आणि बांधकाम दुरुस्तीच्या परवानगीचा सखोल तपास केला जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
सध्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत तरीही NDRF आणि अग्निशमन दलाचे जवान लाईटच्या उजेडात रात्रभर काम करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांसाठी महापालिकेकडून तात्पुरती निवारा व्यवस्था आणि मदत कक्ष उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून अहवाल मागवला आहे. भिवंडीसारख्या गर्दीच्या भागात अशा जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन आता अशा इमारतींचे त्वरित सर्वेक्षण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.