TET परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत मुंबईत हजारो परीक्षार्थी रस्त्यावर उतरले
. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्यास मेहनत करणाऱ्या परीक्षार्थी आणि शिक्षक उमेदवारांचं मोठं नुकसान होणार असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
TET परीक्षेच्या पेपरफुटीची जबाबदारी सरकारनं घ्यावी आणि परीक्षार्थींना उत्तीर्ण घोषित करावं, अशी मागणी त्यांनी केली.
पेपरफुटी ही परीक्षार्थ्यांची चूक नसून यंत्रणेतील त्रुटी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अभ्यंकर म्हणाले की, अनेक उमेदवारांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून ही परीक्षा दिली आहे. मात्र पेपरफुटीमुळे संपूर्ण परीक्षा रद्द केली गेली,
तर प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे सरकारनं परीक्षार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा,
अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, मुंबईत झालेल्या आंदोलनात परीक्षार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “पेपरफुटीची शिक्षा आम्हाला का?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
परीक्षा रद्द करण्याऐवजी सरकारनं दोषींवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
TET चा पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीवरही आंदोलक ठाम आहेत. पेपरफुटी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,
तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे TET परीक्षार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
आता राज्य सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.