पुणे : पक्ष फोडण्यात व्यस्त असलेले सरकार आता पेपर फुटण्यापासूनही वाचवू शकत नाही अशा शब्दात काँग्रेस पक्ष गटनेते रामचंद्र कदम यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले कि, "NEET परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अद्याप ताजी असतानाच आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवक आपल्या भविष्याची स्वप्ने डोळ्यांत ठेवून वर्षानुवर्षे अभ्यास करतात. मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर फुटणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
"सरकारचे संपूर्ण लक्ष प्रशासन सुधारण्यापेक्षा राजकीय कुरघोड्या करण्यात गुंतले आहे. पक्ष फोडण्यात व्यस्त असलेले सरकार आता पेपर फुटण्यापासूनही वाचवू शकत नाही. पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटायला लागले आहेत. ही परिस्थिती राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे." पेपरफुटी हा केवळ गुन्हा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि भविष्यावर झालेला घाला आहे. प्रत्येक वेळी परीक्षा रद्द होते, नवीन तारीख जाहीर होते, मात्र विद्यार्थ्यांचा मानसिक, आ र्थिक आणि शैक्षणिक त्रास कोण भरून काढणार असा सवाल त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटणार नाही, यासाठी तातडीने प्रभावी यंत्रणा उभी करावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये. युवकांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर सरकारने तात्काळ आणि कठोर पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस पक्ष गटनेते रामचंद्र कदम यांनी केली आहे.