Tata Harrier & Safari Cars Price: टाटा मोटर्सचा धमाका: जुलै मध्ये हॅरियर, सफारीसह विविध गाड्यांवर ₹९५,००० पर्यंतची बंपर सवलत! - टॉप न्यूज मराठी

भारतीय वाहन बाजारात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने जुलै २०२६ या महिन्यासाठी आपल्या ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपल्या अनेक लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सवर आकर्षक सवलती आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही या महिन्यात नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टाटाच्या गाड्यांवर तुम्हाला तब्बल ९५,००० रुपयांपर्यंतचे बंपर फायदे मिळू शकतात.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष ऑफर्स टाटाच्या टिगोर (Tigor), अल्ट्रोज (Altroz), नेक्सॉन (Nexon), कर्व्ह (Curvv), हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) यांसारख्या प्रमुख मॉडेल्सवर उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सवलती अंतर्गत दहन इंजिन- आयसीई आणि इलेक्ट्रिक वाहने या दोन्ही प्रकारच्या मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून थेट रोख सवलत, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट किंवा डीलर बेनिफिट्स दिले जात आहेत.

टाटा मोटर्सची प्रीमियम आणि अत्यंत लोकप्रिय मिड-साईज एसयूव्ही 'टाटा हॅरियर'वर कंपनी एकूण ३५,००० रुपयांचे थेट फायदे देत आहे. यामध्ये १०,००० रुपयांची थेट रोख सवलत आणि २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. हॅरियर दमदार १.५ लिटर टर्बो पेट्रोल आणि २.० लिटर क्रायोजेट डिझेल इंजिन पर्यायांसह येते. ही दोन्ही इंजिन १६७.६७ bhp ची दमदार पॉवर निर्माण करतात. डिझेल इंजिन ३५० Nm टॉर्क आणि पेट्रोल इंजिन २८० Nm टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय मिळतात.

हॅरियरप्रमाणेच टाटाच्या सर्वात मोठ्या फ्लॅगशिप एसयूव्ही 'टाटा सफारी'वर देखील ग्राहकांना एकूण ३५,००० रुपयांची बचत करण्याची संधी आहे. सफारीवरही १०,००० रुपयांची कॅश डिस्काउंट आणि २५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ही ७-सीटर एसयूव्ही हॅरियरसारख्याच शक्तिशाली १.५L टर्बो पेट्रोल आणि २.०L क्रायोजेट डिझेल इंजिनसह येते, ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.