Supriya Sule : माझ्यावर अन्याय करू नका, मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांचे खळबळजनक उत्तर, नेमकं काय म्हणाल्या, वाचा सविस्तर - टॉप न्यूज मराठी

कराड: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनंतर ही चर्चा सुरू झाली. त्या बातमीत असा दावा करण्यात आला होता की, शरद पवार हे एनडीएसोबत जाण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची अट ठेवू शकतात. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावे, असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची चर्चा होती. कालपासून राजकीय वर्तुळात यावरच चर्चा सुरू होती. आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली.

सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री होण्याची चर्चा ही काही नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशा चर्चा सुरू आहेत. आधी अशी थिअरी मांडली जात होती की, शरद पवार एनडीएत सामील होतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील. बाकीचे नेते राज्य सांभाळतील आणि सुप्रिया सुळे दिल्ली सांभाळतील. 2014 पासूनच सुप्रिया सुळे मंत्री होणार, मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा दर काही महिन्यांनी समोर येते. 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ही चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार आणि सुप्रिया सुळे मोठी भूमिका घेणार, अशीही चर्चा झाली. आता पुन्हा डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्ताने हीच चर्चा नव्या रूपात समोर आली आहे.

आज सकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यात भर टाकली. शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत आला तर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद आणि आणखी एक राज्यमंत्रिपद मिळेल, महाराष्ट्रातही दोन ते तीन मंत्रिपदे मिळतील, असे आठवले म्हणाले. तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आनंद होईल, असे विधान केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांनी मात्र भाजपच्या मदतीने सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार, ही केवळ अफवा असल्याचे काल सांगलीत स्पष्ट केले होते. शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या:

गेली 12 वर्ष माझा शपथविधी होतोय. माझ्यावर अन्याय करू नका. गेली 12 वर्ष म्हणजे 2014 पासून मी मंत्री होतेय. त्यामुळे या कोणत्याच कथांमध्ये मला घेऊ नका. कालपर्यंत मी केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा होती, आता मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे. मला या कोणत्याच कथांमध्ये रस नाही. संसदेत मी बारामतीचं प्रतिनिधित्व करते. मी महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून जाते. जेपीसीसह चार महत्त्वाच्या समित्यांवर मी काम करत आहे. मला या समित्यांबाबत कोणीच काही प्रश्न विचारत नाही, याचं मला दु:ख वाटतं. मला पॉलिसी मेकिंगबाबत कोणी विचारत नाही. मी ज्यासाठी निवडून गेले, त्याबाबत विचारलं जात नाही. त्यावर एखादा प्रश्न विचारला तर मला आनंद होईल. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. चार जेपीसींमध्ये देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरू आहे. यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणे टाळले. त्यावर त्यांनी हात जोडले आणि रामकृष्ण हरी असे म्हणत विषय संपवला. रोहित पवार यांनी गुप्त बैठक घेतल्याच्या चर्चेवरही त्यांनी हसत उत्तर दिले. काल रोहित नागपूरला नव्हता, लोकेशन चेक करा, असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी चर्चा फेटाळली असली तरी, डिलिमिटेशन विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शरद पवार गट नेमकी काय भूमिका घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.