मुंबई - दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. तुम्हाला या चर्चांचा कंटाळा आला नसेल, पण मला कंटाळा आला आहे. यापुढे मी या विषयावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार असताना नेत्यांमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती, तारीख ठरली होती, हे सत्य आहे, असेही सुळे म्हणाल्या. मात्र दादा गेल्यानंतर आमच्याकडून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तो विषय आमच्यासाठी तिथेच संपला आहे.
अजित पवार गटाकडून काय चर्चा होतात, याच्याशी आमचे देणे घेणे नाही. त्यांच्या प्रतिक्रियांवर आम्ही बोलत नाही, असेही त्यांनी सांगितले. माझा आणि माझ्या भावाचा नातं जवळचं होतं, तो ओलावा कायम राहील, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
महागाई, दुष्काळ, पॉलिसी मेकिंग असे अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी आहेत. लोकशाहीवर आमचा विश्वास आहे आणि सत्तेत सहभागी होणार नाही, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.