मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये मोठे भूकंप होत आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेतून खासदार आणि आमदारांची गळती हा प्रमुख मुद्दा आहे. दरम्यान आता ज्येष्ठ नेते शरद पवार देखील सत्ताधाऱ्यांसोबत सामील होणार अशा चर्चेला उधाण आले असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व चर्चांवर स्पष्टच भूमिका मांडली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा NDA मध्ये सहभागी होणार की नाही यावर स्पष्ट भाष्य केल आहे. त्या म्हणाल्या की, " आमच्याशी कोणी बोलत नाही आणि आम्हीही कुणाशी बोलत नाही. भाजप सोबत जाण्याचा विषय आमच्या चर्चेतच नाही. या बातम्या फक्त वर्तमानपत्र आणि टीव्ही पुरत्याच मर्यादित आहेत. शरद पवार नेहमी सांगतात चांगल्या वाईट कोणत्याही कारणाने आपली चर्चा होत असेल तर आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे. गेली अनेक वर्षे माझ्या शपथविधीच्या बातम्याही सातत्याने येत आहेत." असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला आहे.
त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदार अस्वस्थ असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर देखील बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, " आमचे सर्व खासदार नियमित आमच्या संपर्कात आहेत. आम्ही सातत्याने भेटतो चर्चा करतो आणि पक्षात कोणतीही नाराजी नाही अजित पवार यांची सर्वांनी एकत्र यावं अशी इच्छा होती. या विषयावर पूर्वी चर्चा झाली होती. मात्र आता तो विषय संपला आहे. आम्ही आमच्या मार्गाने आणि ते त्यांच्या मार्गाने पुढे जात आहोत. सध्या दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. " अशा स्पष्ट वाक्यांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम दिला असल्याचे दिसते आहे.