SUBODH BHAVE : "सई किती टिकेल शंका"; 'बोल बोल राणी'च्या निमित्ताने सुबोध भावे स्पष्टच बोलला - टॉप न्यूज मराठी

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर Sai Tamhankar आज प्रत्येकाच्या तोंडी आहे. मालिकांपासून सुरुवात करून हिंदी-मराठी सिनेमांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या सईला 2013 मधील 'दुनियादारी' या सिनेमाने खरी ओळख मिळवून दिली. ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिकांमुळे ती कायम चर्चेत असते. नुकताच सई, सुबोध भावे Subodh Bhave आणि चिन्मय मांडलेकर Chinmay Mandalekar यांचा 'बोल बोल राणी' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सुबोध भावेने सईबद्दल मनमोकळेपणाने मत मांडले.

"सई बाळ होती, तेव्हा शंका होती"

कलाकृती मीडियाशी बोलताना सुबोध भावे म्हणाला, "सई जेव्हा सांगलीहून मुंबईत आली होती तेव्हा ती एकदम बाळ होती. आम्ही दोन-तीन प्रोजेक्ट्स एकत्र केले. सनई-चौघडेमध्येही आम्ही सोबत होतो. चिन्मयबद्दल आधीच माहिती होती की तो उत्तम अभिनेता आहे. वादळवाटमध्येही आम्ही काम केले आहे. पण सई किती टिकेल याबाबत मला खरंच शंका होती. काम ती वाईट करत नव्हती, पण त्या काळात तिचा फोकस नव्हता."

सुबोधच्या मते, 'श्वास' नंतर जशी मराठी इंडस्ट्री बदलली, तशीच 'दुनियादारी'नंतर सईची कारकीर्द बदलली. "त्या सिनेमापासून सईचे वेगळे वर्जन बाहेर आले," असे तो म्हणाला.

"आता ती जाणीवपूर्वक सूज्ञपणे काम करते"

पुढे बोलताना सुबोध म्हणाला की, " आता सई खूप फोकसने आणि विचारपूर्वक भूमिका निवडते. "तोपर्यंत ती वाईट काम करत होती का? अजिबात नाही. ती काम करत होती. पण आता ती जाणीवपूर्वक सूज्ञपणे काम करते. हाच तिच्यातला मोठा फरक आहे." सुबोधने सईच्या प्रवासाची तुलना मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्रींशीही केली. "आपण रंजनाताई, जयश्री गडकर, अलका कुबल यांची नावे घेतो. मला वाटते या काळाचे प्रतिनिधीत्व मुक्ता आणि सई करत आहेत. पुढील काही वर्षांनी जेव्हा या काळाबद्दल बोलले जाईल, तेव्हा या दोघींनी हा काळ गाजवला असे म्हटले जाईल."

थोडक्यात, एकेकाळी जिच्या टिकण्याबाबत शंका होती, त्याच सईला आज सुबोध भावेसारखा ज्येष्ठ अभिनेता इंडस्ट्रीचा चेहरा मानत आहे.