सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील बोरामणी जवळ असलेल्या मस्के वस्तीवर तिहेरी हत्याकांडाची घटना घडली.
आरोपी दीराने आपल्या वहिनीची आणि तिच्या दोन मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड झालं.
या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बोरामणी येथे मस्के कुटुंब वास्तव्यास होते. सध्या उन्हाळा असल्यानं गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रियंका मस्के आणि मुलगा शिवराज मस्के हे तिघेही रात्री घराच्या
टेरेसवर झोपले होते. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी टेरेसवर चढून झोपलेल्या तिघांवर तलवारीनं सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र 17 वर्षांच्या शिवराजला जाग आली. त्याने आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार केले.
त्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी टेरेसवरून खाली पळाला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर तलवारीनं हल्ला केला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
हे संपूर्ण हत्याकांड आरोपी दिरानं रचलं होतं. आरोपीला आणखी दोन भाऊ व त्यांची कुटुंब आहेत. मात्र दोन्ही भावांचं निधन झालं आहे.
ज्यामुळे संपूर्ण प्रॉपर्टी फक्त आपल्याला मिळाली म्हणून त्याने हत्याकांड घडवून आणल्याचा संशय आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के, त्याची पत्नी राणी, मुलगा धीरज, मुलगी दीक्षा, त्याचा मेहुणा सूरज मोरे आणि शेजारी वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
विशेष म्हणजे आरोपीला मयत वहिनीनं 25 लाख रुपये उसने दिले होते.
त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत केली होती. याच पैशांसाठी वहिनीने त्याच्या मागे तगादा लावला होता.
हे पैसे द्यायला लागू नयेत म्हणून आणि प्रॉपर्टी साठी त्याने हे तिहेरी हत्याकांड घडवल्याचा संशय आहे.
दरम्यान मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पोलीस पथकं रवाना झाली आहेत. गुन्ह्याचा तपास सुरू आहे.