आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. या दिवशी अनेक भाविक बाळकृष्णाच्या जन्मापर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत उपवास करतात. उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही, तर शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणे आहे. योग्य पद्धतीने उपवास केल्यास दिवसभर थकवा येत नाही आणि भक्तीचा खरा आनंद मिळतो.
सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि देवघर स्वच्छ करा. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून त्याला गंगाजल आणि पंचामृताने स्नान घाला. नवीन वस्त्रे घालून झोपाळ्यात बसवा. दिवसभरात ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि शक्य तितके मन शांत ठेवा. वाईट विचार, राग आणि वाद टाळा. रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा सोहळा झाल्यावर आरती करून प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो. काही लोक दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडतात.
उपवासात दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. फळांमध्ये केळी, सफरचंद, पपई, चिकू, द्राक्षे तुम्ही दिवसभरात दोन ते तीन वेळा खाऊ शकता. दूध आणि दुधाचे पदार्थ जसे की दही, ताक, लोणी, पनीर हे तर कृष्णाला प्रिय आहेत आणि उपवासात चालतात. उपवासाची धान्ये म्हणून वरईचे तांदूळ, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, राजगिरा लाडू, शेंगदाणे आणि मखाना खाऊ शकता. पिण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी, नारळ पाणी आणि लिंबू सरबत घ्या म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही. तसेच उकडलेला बटाटा आणि रताळ्याची खीर हे पदार्थ पोट भरायला मदत करतात.
उपवासात काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. साधे पांढरे मीठ खाऊ नये, त्याऐवजी सैंधव मीठ म्हणजेच उपवासाचे मीठ वापरावे. गहू, तांदूळ, डाळ, मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ जसे की ब्रेड, बिस्किटे खाऊ नयेत. आजच्या दिवशी कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य करावा. मांसाहार, दारू आणि सिगारेट तर चुकूनही घेऊ नये. बाहेर मिळणारे पॅकेट फूड, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि जास्त तेलकट तळलेले पदार्थ टाळा, त्यामुळे पित्त वाढू शकते.
महत्वाची टीप म्हणजे ज्यांना शुगर, ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तसेच गरोदर महिला आणि लहान मुलांनी पूर्ण दिवस उपाशी राहू नये. त्यांनी फळे आणि दूध घेत हलका उपवास करावा.