हिंदू सण-उत्सव, संस्कृती आणि अध्यात्मामध्ये ‘श्रावण’ महिन्याला सर्व महिन्यांचा राजा मानले जाते. कडक उन्हाळ्यानंतर आणि पावसाच्या आगमनानंतर संपूर्ण सृष्टी जेव्हा हिरवा शालू परिधान करते, अशा निसर्गरम्य वातावरणात श्रावण महिन्याची सुरुवात होते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या या महिन्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. यंदा महाराष्ट्रात म्हणजेच अमान्त दिनदर्शिकेनुसार पवित्र श्रावण महिन्याचा प्रारंभ गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, याची समाप्ती शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी होईल.
श्रावण महिना हा पूर्णपणे देवाधिदेव भगवान शिवशंभूंना समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये महादेवाची आराधना केल्याने सर्व संकटांतून मुक्ती मिळते आणि घरात सुख, समृद्धी, शांती नांदते, अशी कोट्यवधी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. म्हणूनच, संपूर्ण वर्षात या एका महिन्याची वाट सर्व शिवभक्त अत्यंत आतुरतेने पाहत असतात.
श्रावणी सोमवार व्रत २०२६: पूर्ण वेळापत्रक
श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला एक वेगळे महत्त्व आहे, मात्र यामध्ये 'श्रावणी सोमवार'चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी महादेवासाठी व्रत-उपवास ठेवण्याची जुनी परंपरा आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण ४ श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा आणि महाराष्ट्रात वाहिल्या जाणाऱ्या पारंपरिक 'शिवामूठ'चे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१. पहिला श्रावणी सोमवार – १७ ऑगस्ट २०२६: या दिवशी पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाईल. यादिवशी महादेवाला 'तांदूळ' शिवामूठ म्हणून अर्पण केले जातात.
२. दुसरा श्रावणी सोमवार – २४ ऑगस्ट २०२६: या दिवशी दुसऱ्या सोमवारचे व्रत असून, भगवान शिवाला 'तीळ' अर्पण केले जातात.
३. तिसरा श्रावणी सोमवार – ३१ ऑगस्ट २०२६: या दिवशी तिसऱ्या सोमवारचे व्रत केले जाईल. यादिवशी महादेवाला 'मूग' शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आहे.
४. चौथा श्रावणी सोमवार – ७ सप्टेंबर २०२६: हा या महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार असेल. या दिवशी महादेवाला जवस शिवामूठ म्हणून अर्पण करून व्रताची सांगता केली जाते.
धार्मिक महत्त्व आणि महात्म्य
भगवान शिवाला 'भोलेनाथ' म्हटले जाते, कारण ते अत्यंत साध्या आणि निष्कपट भक्तीनेही लवकर प्रसन्न होतात. पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने भगवान शिवशंभूंना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यातच अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले.
याच मान्यतेमुळे, आजही कुमारिका मुली मनपसंत, सुविद्य आणि योग्य वर प्राप्तीसाठी श्रावणी सोमवारचे कडक व्रत करतात. तसेच, विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी हे व्रत मनोभावे करतात. असे मानले जाते की, या दिवशी केलेल्या शिवपूजेचे फळ इतर दिवसांपेक्षा हजार पटीने अधिक मिळते.
श्रावणी सोमवारचे व्रत अत्यंत साधे पण तितकेच फलदायी आहे. या दिवशी खालीलप्रमाणे पूजा विधी करावा: सोमवारी सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करून महादेवाच्या व्रताचा संकल्प करावा. घरातील शिवलिंगावर किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन शुद्ध जल, कच्चे दूध, मध, दही आणि तूप अर्पण करून 'रुद्राभिषेक' करावा. महादेवाला अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र (ज्यावर 'ॐ नमः शिवाय' लिहिलेले असावे), धोत्र्याचे फूल, आणि पांढरी फुले अर्पण करावीत. महाराष्ट्रातील परंपरेनुसार, प्रत्येक सोमवारच्या ठरलेल्या धान्याची एक मूठ शिवलिंगावर नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।। किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असे तीन वेळा म्हणत अर्पण करावी. पूजा करताना संपूर्ण वेळ 'ॐ नमः शिवाय' या महामंत्राचा अखंड जप करावा. शिवचालीसा किंवा शिव आरत्या म्हणाव्यात. या दिवशी पूर्ण उपवास करावा. दुपारी फलाहार किंवा साबुदाणा उसळ घ्यावी आणि संध्याकाळी महादेवाची आरती करून सात्त्विक भोजन करावे.
श्रावण महिना हा केवळ उपवासाचा नाही, तर आपल्या मनातील वाईट विचार, राग आणि अहंकार त्यागून सात्त्विक जीवन जगण्याचा काळ आहे. निसर्गाच्या सुंदर रूपाचा आनंद घेत, शिवभक्तीमध्ये लीन होण्यासाठी हा महिना अत्यंत उत्तम मानला जातो.