पुणे - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज अखेर पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कफ आणि थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांचा दुष्काळी पाहणी दौरा आणि सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
रुग्णालयात त्यांच्यावर विविध चाचण्या करून उपचार करण्यात आले. आता प्रकृती स्थिर आणि ठणठणीत असल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
डिस्चार्जनंतर पवार व्हिलचेअरवरून बाहेर आले. त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले. त्यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर ते बारामतीला न जाता थेट मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. सुळे यांनी डॉक्टरांचे आभार मानले.