SBI Kharadi Pune Property Purchase Deal Of 414 Crore: पुण्यात एसबीआयचा मोठा व्यवहार: खराडीत ४१४ कोटींना खरेदी केली इमारत व भूखंड - टॉप न्यूज मराठी

पुणे: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुण्यातील आयटी आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या खराडी परिसरात मोठा व्यवहार केला आहे. खराडी नॉलेज पार्कमधील मोक्याचा भूखंड आणि इमारत असलेली व्यावसायिक मालमत्ता बँकेने ४१४ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात एखाद्या बँकेने केलेल्या सर्वात मोठ्या कार्यालयीन मालमत्ता व्यवहारांपैकी  हा एक मानला जात आहे.  

रिअल इस्टेट डेटा विश्लेषक संस्था 'सीआरई मॅट्रिक्स'ने  दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी या कराराचे नोंदणीकरण पूर्ण झाले. या व्यवहारासाठी एसबीआयने सुमारे २८.९८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरले आहे. हा व्यवहार 'सिद्धिविनायक एंटरप्रायझेस' आणि 'स्टेट बँक ऑफ इंडिया' यांच्यात 'डीड ऑफ असाइनमेंट'द्वारे पार पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय आपल्या महाराष्ट्र सर्कल च्या स्थानिक मुख्य कार्यालयासाठी या इमारतीचा वापर करणार आहे. यासाठी बँकेने यापूर्वी खराडी, विमान नगर किंवा बाणेर परिसरात तयार इमारतीसाठी निविदा मागवल्या होत्या.  

पुण्यातील खराडी परिसर हा आयटी कंपन्या, नामांकित कॉर्पोरेट कार्यालये आणि 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'  साठी एक महत्त्वाचा 'कमर्शियल हब' बनला आहे. नगर रस्ता आणि पुणे विमानतळाच्या जवळ असलेल्या या भागात एसबीआयने एवढी मोठी जागा स्वतःच्या मालकीची केल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात या व्यवहाराची जोरदार चर्चा सुरू आहे. भाड्याच्या जागेवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या मालकीची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याच्या दिशेने एसबीआयचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.