जगभरात AI चा वापर वाढतोय आणि आता त्याचा थेट फटका नोकऱ्यांना बसायला लागला आहे. जर्मनीच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी SAP ने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. कंपनी सुमारे 10 हजार पदे कमी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
SAP मध्ये जगभरात सुमारे 1 लाख 10 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी जवळपास 9 टक्के कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. कंपनीच्या सर्व विभागांना कुठे कर्मचारी कमी करता येतील, याची यादी तयार करण्यास सांगितले आहे. प्रोडक्ट, इंजिनिअरिंग आणि सेल्स या विभागांवर जास्त लक्ष आहे.
SAP चे CEO ख्रिश्चन क्लेन कंपनीला पूर्णपणे AI फर्स्ट बनवत आहेत. सॉफ्टवेअरमध्ये AI टूल्स जास्त वापरले जावेत, यासाठी कंपनी काम करण्याची पद्धत बदलत आहे. याच कारणामुळे ही कपात होणार असल्याचे बोलले जात आहे.
ही काही SAP मधील पहिली कपात नाही. 2024 मध्येही कंपनीने 10 हजार लोकांना बाहेर काढले होते. त्यावेळी कंपनीला 3 अब्ज युरो खर्च आला होता. त्यावेळी अनेकांना स्वतःहून नोकरी सोडण्याचा आणि नवीन कौशल्य शिकण्याचा पर्याय दिला होता.
सध्या कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. जानेवारी 2027 मध्ये वार्षिक निकालासोबत याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. जर्मनीतील कर्मचाऱ्यांना 2028 पर्यंत नोकरीची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यावर किती परिणाम होणार, हे पाहावे लागणार आहे.