Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणी - टॉप न्यूज मराठी

पुणे, दि. २५  जून २०२६ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची पूर्वपाहणी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बोपोडी मेट्रो स्थानकापासून या पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला.

या पाहणी दौऱ्यात माजी नगरसेवक आनंद छाजेड, नगरसेवक  भक्ती गायकवाड, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर, मलनिःसारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरीभक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवले पाटील, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी प्रेमलता घाटे, विभागीय आरोग्य अधिकारी पखाले, उपअभियंते दीपक लांडे व डॉ. बढीये, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर व कांबळे, औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, मलनिःसारण व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधांची सविस्तर पाहणी करण्यात आली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमहापौर वाडेकर यांनी दिल्या.

पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.