शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडक प्रशासक म्हणून ओळख असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचारावर राऊत यांनी थेट बोट ठेवले आहे.
राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, तुकाराम मुंढे यांचा दरारा आणि इफेक्ट आता FDA च्या कार्यालयातही दिसणे गरजेचे आहे. FDA मधील काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत आणि सामान्य जनतेची लूट करत आहेत. आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा आणि मग इतरांवर कारवाई करा असा सल्ला राऊत यांनी मुंढेंना दिला आहे.
राऊत यांनी या पत्रात FDA मधील अधिकाऱ्यांकडून परवाने देणे, तपासणी आणि कारवाईच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले होते. नागपूर आणि नवी मुंबईतील त्यांच्या कामाचे उदाहरण देत त्यांनी मुंढे हे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्याच मुंढेंकडे असलेल्या FDA विभागातील कारभारावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तुकाराम मुंढे सध्या FDA आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर औषध कंपन्यांवर आणि अन्न भेसळ करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. अशा वेळी राऊत यांचे हे पत्र आल्याने FDA विभागात खळबळ उडाली आहे.
या पत्रावर तुकाराम मुंढे काय उत्तर देणार आणि FDA मधील कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.