राजकारण : मुंबईत छट पूजेनिमित्त रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याच्या प्रकारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना जोरदार टीका केली. त्याचवेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही मिश्किल भाषेत भाष्य केले. त्यांचे हे भाष्य आता चर्चेचा विषय बनले आहे.
छट पूजेच्या गाण्यावरून राऊत काय म्हणाले
मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर छट पूजेनिमित्त भोजपुरी गाणी लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे राजकारण मुंबईत आणू नका. मुंबईचा प्लॅटफॉर्म हा घोषणा करण्यासाठी आहे, गाणे लावण्यासाठी नाही. दिवाळी, होळी, ख्रिसमस आणि ईदच्या वेळी प्लॅटफॉर्मवर गाणी लावली जात नाहीत. मग आता का लावली जात आहेत. उत्तर प्रदेशात निवडणूक आहे, म्हणून महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. राज्याच्या संस्कृतीपेक्षा दुसरी संस्कृती वरचढ करू नका. असेच केल्याने वाद होतात.
छट पूजा हा सण आहे. सण म्हणूनच साजरा करा. आम्हीही तुमच्या सणात सहभागी होऊ. पण सणाचे राजकारण करू नका, असेही राऊत म्हणाले.
विलीनीकरणावर राऊत यांचा मिश्किल टोला
याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर जोरदार टोला लगावला. विलीनीकरण विलीनीकरण हा खेळ आता राष्ट्रीय खेळामध्ये आणला पाहिजे. ऑलिम्पिकमध्येही मर्जर मर्जर हा खेळ आणला पाहिजे. महाराष्ट्रात हा खेळ उत्तम सुरू आहे. लोकांचे मनोरंजन होत आहे. लोकांना या खेळात भाग घेतल्यासारखे वाटत आहे. मोठमोठे खेळाडू यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात मर्जर मर्जरचा खेळ व्यवस्थित खेळला जात आहे. लोक आता यात ट्रेंड झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय खेळांमध्ये मर्जर मर्जर किंवा विलीनीकरण विलीनीकरण हा खेळ समाविष्ट करा. मी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, असे राऊत म्हणाले.
राष्ट्रवादीवाले अजूनही गल्लीतच खेळत आहेत. त्यांची हळूहळू प्रॅक्टिस सुरू आहे. हा सामना शेवटपर्यंत अनिर्णित राहील. खेळाडू खेळत राहतील. मध्ये पाऊस पडेल, ढग येईल, कोणीतरी पीच उखडेल. आमचा पक्ष या खेळाकडे लक्ष ठेवून नाही. हा खेळ त्यांच्यातच खेळला जात आहे, असेही राऊत म्हणाले.
शरद पवार हे क्रिकेटचेच मार्गदर्शक राहतील. या खेळात ते सामील होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना या खेळात पंच म्हणून काम करायचे आहे. मला विचारा आणि निर्णय घ्या. म्हणजे फिक्सिंग. त्यांचा विषय फिक्सिंगवर असतो. आधी निकाल फिक्स करा आणि मग खेळायला जा, असे मुख्यमंत्र्यांचे धोरण असते, असा चिमटाही त्यांनी काढला.
विलीनीकरणावर राजकीय बड्या नेत्यांची प्रतिक्रिया काय
विलीनीकरणाच्या चर्चेवर आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी याआधीच स्पष्ट केले होते की, आम्ही कुठेही जाणार नाही, यायचे असेल तर आमच्यासोबत या, आमचा पक्ष स्वतंत्रपणे लढेल. सुप्रिया सुळे यांनीही विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावत सध्या अशी कोणतीही चर्चा नाही, असे सांगितले होते. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी जशी वेळ येईल तशा गोष्टी समजतील, योग्य वेळ आली की सगळे स्पष्ट होईल, असे सूचक विधान केले होते. सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारीला विलीनीकरण झाले असते, असे सांगत आता मात्र विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही, असे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरण होऊ शकत नाही, असे म्हटले होते, तर रोहित पवार यांनी विलीनीकरणाबाबत आमच्या पक्षात कोणतीही चर्चा नाही, ही चर्चा फक्त अजितदादा गटात आणि माध्यमांमध्ये सुरू आहे, असे सांगितले होते.
राऊत यांच्या विधानानंतर विलीनीकरणाची चर्चा पुन्हा का तापली
राऊत यांनी विलीनीकरणावर मिश्किल टिप्पणी केली असली तरी त्यामागे राजकीय अर्थही काढला जात आहे. गेल्या काही दिवसांत अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली होती. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच्या भेटीत 10 तारखेनंतर एकत्र बसू, असे शरद पवार म्हणाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सध्या अधिकृत चर्चा नाही, असेच सांगत आहेत.
राऊत यांच्या या मिश्किल शैलीतील भाष्यामुळे आता विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. हा खेळ खरेच अनिर्णित राहणार का, की येत्या काही दिवसांत यातून काहीतरी ठोस समोर येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.