पुणे - शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता, अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजला नव्हता आणि लोकमान्य टिळक तुरुंगातून आले तेव्हा डीजे वाजला नव्हता, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत डीजे समर्थकांवर जोरदार हल्ला चढवला. हा सांस्कृतिक उत्सव आहे, यात उत्तरेकडील संस्कृती आणू नये या राज ठाकरे यांच्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले.
आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः डीजे चे समर्थन करणाऱ्या मंत्र्यांवर टीका केली. मिंद्यांचे दोन तीन मंत्री सोडले तर राज्यातील कोणीही डीजेचे समर्थन करत नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी डीजे वाजवण्यास पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या आवारात डीजे वाजवत बसावे, काही दिवसांनी त्यांना हेच काम करावे लागणार आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे कुंपणावर आहेत, जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच सामाजिक प्रश्नावर कुंपणावर बसून मजा बघत असतील तर कायद्याचे राज्य कसे चालेल, असा सवालही त्यांनी केला. नागपूर आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी डीजे बंदीची भूमिका घेतली मग पुण्यातच वेगळा नियम का, मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे का, असेही राऊत म्हणाले.
पुणे आणि महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावरून मोठा वाद सुरू आहे. पुणेकरांनी काल रस्त्यावर उतरून डीजे मुक्त गणेशोत्सवाची मागणी केली. डीजे मुळे ध्वनी प्रदूषण, शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वतः सांगितले की डीजे च्या गोंधळामुळे त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. पुण्यातील मोर्चात सहभागी वर्षा कदम या महिलेच्या वडिलांनी रुग्णवाहिका न आल्याने हातावर प्राण सोडल्याची घटना घडली. त्यामुळे हा विषय आता केवळ सांस्कृतिक न राहता जीवाशी संबंधित बनला आहे.
काल पुण्यात झालेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी बापट नावाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी जीवाला धोका असल्याचे सांगून रोखले. यावरून राऊत यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या पुण्यात नरेंद्र दाभोळकरांची हत्या होते तिथे एका नागरिकाला मोर्चात येऊ नका असे पोलिस सांगतात, हा गृहमंत्र्यांचा पराभव आहे, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा असे ते म्हणाले. तसेच ठाण्यात गौतमी पाटीलला नाचवून हिडीस नृत्य करणे ही कोणती संस्कृती आहे, भाजपच्या सुपारी किलर संस्कृती रक्षकांना आवरावे असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले. एका सामाजिक भावनेतून लोक एकत्र आले असतील तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे असेही राऊत शेवटी म्हणाले.