मुंबई: शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यानंतर पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले, "बाळासाहेबांचा पक्ष अमित शाह आणि निवडणूक आयोगाने मिळून विकला आहे. हे लोकशाहीसाठी काळा दिवस आहे."
1. पक्ष फोडण्याचा आरोप : "तृणमूल फोडणं, शिवसेना फोडणं, राष्ट्रवादी फोडणं हे पंतप्रधान आणि अमित शाह यांचं काम आहे का? डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी आजही खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार संविधान गुदमरण्यासारखा आहे."
2. देशातील परिस्थितीवर टीका: "काश्मीरमध्ये हल्ले होत आहेत, मणिपूर पेटलं आहे. देशात अस्वस्थता आहे, तरुण चिडलेला आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. रुपया घसरत आहे. यावर प्रधानमंत्री टेलीप्रॉम्टरशिवाय बोलू शकतील का?"
3. मोदी-शाह यांच्या राजीनाम्याचा दावा : राऊत यांनी सर्वात मोठं विधान करत म्हटलं, "2029 पूर्वीच मोदी आणि शाह यांना राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. जागतिक स्तरावरही आणि देशातही त्यांच्याविरोधात वातावरण आहे."
4. परराष्ट्र धोरणावर खोचक टिप्पणी : "राष्ट्राध्यक्षांना घट्ट मिठी मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नसतं" असा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडली. मात्र निकालापूर्वीच राऊत यांनी भाजप आणि आयोगावर टीकेची झोड उठवली. एकूणच शिवसेना चिन्हाच्या सुनावणीनंतर राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.