SANJAY RAUT : सुप्रीम कोर्टात शिवसेना खटल्याची सुनावणी; "आम्हाला न्याय मिळेल"; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊतांचा विश्वास - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "आम्ही समाधानी आहोत. आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे."

आजचे 3 महत्वाचे मुद्दे:

1. आयोगाचा निर्णय चुकीचा  

सिब्बल यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने *विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर* पक्ष आणि चिन्ह दिले. मात्र *पक्षांतर्गत फूट* आणि *राजकीय पक्ष* हे दोन्ही वेगळे आहेत. त्यामुळे आयोगाचा निर्णय घटनाबाह्य आहे.

2. "मुख्य नेता" पदावरच आक्षेप 

शिवसेनेच्या 1999 च्या घटनेत "मुख्य नेता" नावाचे पदच नाही. मग शिंदे गटाने ही नियुक्ती कोणत्या आधारावर केली ? तसेच 2018 चा घटनाबदल जर बेकायदेशीर आहे, तर त्यानुसार झालेली निवड कशी कायदेशीर ठरेल, असा सवाल सिब्बलांनी केला.

3. पक्ष-चिन्ह देण्याचा अधिकार नाही  

कलम 29A नुसार निवडणूक आयोगाला पक्ष फोडून दुसऱ्याला चिन्ह देण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद सिब्बलांनी मांडला. देशातील पक्षांतराच्या चुकीच्या प्रथांवरही त्यांनी भाष्य केले.

राऊत म्हणाले, "सिब्बलांच्या युक्तिवादाने आयोगाच्या चुकांची पिसं काढली. हा निर्णय भविष्यातील पक्षांतराच्या खटल्यांसाठी माईलस्टोन ठरेल." आता पुढील सुनावणी मंगळवारी दुपारी 2 वाजता होणार आहे. तोपर्यंत शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे.