मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आगामी निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वात लढवणार आहे, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल केली होती. या विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमांशी बोलताना राऊत यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट गोरेंवर हल्लाबोल केला.
राऊत म्हणाले, "गोरे काय बोलत आहेत याला काही भान आहे का? अभिजीत दीपके या तरुणाने तुमच्या पंतप्रधानांनाच गुडघे टेकायला भाग पाडले. दीपकेंच्या आंदोलनामुळे अमित शाह आणि मोदींना बिळात बसावे लागले होते. दीपकेला सर्वात पहिला पाठिंबा आम्हीच दिला होता. हा तरुण भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्ही सातारसारख्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करता, थोडी तरी मर्यादा ठेवा." यावेळी राऊतांनी भाजपवरही टीका करताना सांगितले की तरुणांनीच भाजपला गुडघ्यावर आणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक व्हिडिओ शेअर करून टीका करणाऱ्या तरुणांना माफ केल्याचे जाहीर केले होते. त्यावरूनही राऊतांनी मोदींवर निशाणा साधला. "हे कोण माफ करणारे? ही तर त्यांचीच शरणागती आहे. त्या मुलांनी माफी मागितली का? आम्ही मागितली का? 'साहेब चुकलो' असे कोणी म्हटले का? देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री मानसिकदृष्ट्या भरकटले आहेत. त्यांनी आपले सल्लागार बदलावेत. माफ करत असाल तर मग शेकडो मुलांचे चारित्र्य का पडताळत आहात?" असा सवाल त्यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, "तुम्हीच लोकांना 50 करोड गर्लफ्रेंड, जर्सी गाय असे शब्द वापरले होते. दुसऱ्यांच्या आयाबहिणी काढल्या होत्या ते विसरलात का? ही तरुणांची भावनांची प्रतिक्रिया होती. याच मुलांच्या बळावर तुम्ही सत्तेत आलात. बाळासाहेबांचा पक्ष फोडला तेव्हा आम्हाला वेदना झाल्या नाहीत का?"
शेवटी त्यांनी चंद्रकांत पाटलांवरही खोचक टिप्पणी केली. "दादांना आता दगड गोळा करण्याचे काम मिळाले आहे. अमित शाहांनी त्यांना ही जबाबदारी दिली आहे. चार ट्रक दगड गोळा करणार आहेत. दादा महान वैज्ञानिक आहेत. त्यांच्यासमोर डॉ. कलामही फिके पडतील. आता त्यांनाच विज्ञानाचा पुरस्कार दिला पाहिजे," असे म्हणत त्यांनी व्यंग्यात्मक टोला लगावला.