मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच मोठमोठ्या खलबती होत आहेत. नेमकं कोण कोणाच्या सोबत आहे. याबाबत आता महाराष्ट्र भ्रमित व्हायला लागला आहे. खरंतर काल महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न विधानभवनात बैठक होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचे स्वागत करून भेट घेतली होती. यावरून अनेक दिवसांपासून शरद पवार हे एनडीए सोबत जाणार या चर्चेला पुन्हा हवा मिळाली होती. दरम्यान आज आता उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे .
8 जुलै रोजी विधान भवनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न महत्त्वाची बैठक होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी आपल्या पक्षाची बैठक घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिमंडळाची बैठक सोडून दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत केलं. यावरूनच आता महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाल आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा मोठे भूकंप होत आहेत सहा खासदार आणि एक आमदार गेल्यानंतर आता आणखी अनेक आमदार आणि नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असं बोललं जात असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली गाठ भेट यावरून संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की," शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली, त्यांच्या दालनात बैठक घेणे योग्य नाही. अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का, विधानभवनाच्या परिसरात समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मविआच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांनी नियम पाळायला पाहिजेत, हे आमच्यासारख्या निष्ठावंताचं मत आहे. आम्ही इतकेही सहिष्णु नाही, एवढं आमचं मन मोठं नाही, ज्यांचं ते आहे, त्यांनी ते करावं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासहर्ता कमी होते, असे संजय राऊत यांनी म्हटले. शरद पवारांच्या कृतीमुळे सगळेच दुखावले गेले असतील. आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना भेटणे यामध्ये काहीही गैर नाही.शरद पवार यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनात तुम्ही येता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे, असे संजय राऊत स्पष्ट सांगितले. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. मला त्यांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. पण शरद पवार यांच्या कालच्या कृतीने शिवसेना अस्वस्थ आहे. या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही महाराष्ट्राला काय दाखवताय, तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देत आहात. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर तुमच्या पक्षात झालेल्या गद्दारीविषयी बोलण्याचा हक्क नाही. त्या गद्दारांविरोधात कोर्टात जाणं, लढणं, याची गरज काय? एकनाथ शिंदे हे यशवंतराव चव्हाण किंवा शंकरराव चव्हाण आहेत का, वसंतदादा पाटील आहेत की, वसंतराव नाईक आहेत की विलासराव देशमुख आहेत की, त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही बैठक घेता. ही गोष्ट आमच्या मनाला लागली आहे." अशा शब्दात संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.