मुंबई : महाराष्ट्रात आरक्षणाचा वणवा पुन्हा पेटला आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या लढाईने राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता भटक्या विमुक्त समाजाचाही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा इशारा विरोधकांनी नाही तर थेट महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनीच दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना आणि ओबीसी नेते उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत धडक देण्याच्या तयारीत असताना, सत्ताधारी मंत्र्यानेच आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारची कोंडी वाढली आहे.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. "ज्या समाजाला कायम गुन्हेगार म्हणून पाहिलं जायचं, त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत. स्वातंत्र्यानंतरही गावा-खेड्यात या भटक्या विमुक्त समाजाचे हाल होत आहेत, त्यांना सुविधा नाहीत, शिक्षण नाही आणि समाज विखुरलेला आहे. जसं मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, ओबीसी लढतोय, आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाही. पण या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही आमची मागणी आहे. आरक्षण मिळावं यासाठी आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढू," असा थेट इशारा राठोड यांनी दिला आहे. आज या समाजाची मोठी परिषदही होत आहे.
दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा निर्णायक लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. अंतरवाली सराटी येथे गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. हे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असे सांगितले जात असले तरी सरकारचा प्रस्ताव जरांगे यांना मान्य होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सहकाऱ्यांशी चर्चा करून लाखो लोकांसह मुंबईत धडक देण्याचा फायनल प्लान जरांगे करणार आहेत.